पुण्यातील स्वारगेट एसटी बस आगारात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्काराचा आरोप असलेला दत्तात्रय गाडे हा आरोपी फरार आहे. पोलिसांनी त्याच्या भावाकडे त्याची चौकशी सुरु केली आहे. दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुण्यातील शिरुर पोलीस स्थानकात या आधी चोरी आणि चेन स्नॅचींग यासारख्या गुन्ह्यांची नोंद आहे.
- Advertisement -
पीडित तरुणीने या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. आरोपी दत्तात्रय गाडेला शोधण्यासाठी पोलिसांनी आठ पथकं तयार केली आहेत. या पथकांकडून दत्तात्रय गाडेचा कसून शोध घेतला जात आहे. दत्तात्रय गाडे हा पुण्याच्या आजुबाजूच्या परिसरातील शेतात लपण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडून शेतात डॉग स्क्वाडच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे. पोलिसांनी दत्तात्रय गाडे याच्या भावाला गाठले असून त्याच्याकडून माहिती घेतली जात आहे.
- Advertisement -
मंगळवारी (25 फेब्रुवारी) पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली. स्वारगेट डेपोतील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये पीडित आणि आरोपी दोघंही स्पष्टपणे दिसत नाहीत. बस ज्या ठिकाणी उभी आहे, त्याठिकाणी अंधार आहे. आजूबाजूला अनेक बस असल्याचे देखील दिसत आहे. स्वारगेट बस आगाराच्या मधोमध ही बस उभी असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. या शिवशाही बसवर सोलापूर-स्वारगेट अशी पाटी लिहिलेली आहे. पोलिसांकडून सध्या या शिवशाही बसची तपासणी सुरु आहे. या बसमध्ये पोलिसांना काही पुरावे मिळतात का, हे बघावे लागेल. तसेच पीडित तरुणीच्या वैद्यकीय तपासणी अहवालातून कोणती माहिती समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

