राज्यात उष्माघाताचे चार रूग्ण

Team Daily Yashwant
Team Daily Yashwant 86 Views 2 Min Read
2 Min Read
Four heatstroke patients in the state

पुणे : राज्यात उन्हाचा पारा वाढत असून, उष्माघाताच्या चार रुग्णांची नोंद झाली आहे. यात जालना जिल्ह्यात दोन, तर नांदेड आणि ठाणे जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. उष्माघातामुळे गेल्या दोन वर्षांत पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

- Advertisement -

आगामी दिवसांमध्ये उष्णता वाढणार असल्याने आरोग्य विभागातर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत. उष्माघाताच्या रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रासह सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये विशेष कक्ष सुरू करण्यात आले आहेत. या कक्षांच्या माध्यमातून रुग्णांना आपत्कालीन स्थितीत उपचार देण्यात येणार आहेत.

- Advertisement -

सर्व जिल्ह्यांतील आणि महापालिका आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. वातावरणातील बदलांमुळे निर्माण होणाऱ्या आजारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे वातावरणीय बदल आणि मानवी आरोग्याचे सल्लागार डॉ. मयुरेश सासवडे यांनी सांगितले.

- Advertisement -

आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर म्हणाल्या, ‘उष्णतेमुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. डिहायड्रेशन, उष्माघातासह आरोग्याविषयक समस्या या काळात वाढण्याची शक्यता असते. उष्णतेमुळे त्रास होणारी नाही, यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी. कोणत्याही व्यक्तीला उष्णतेचा त्रास झाल्यास त्या व्यक्तीला सावलीच्या ठिकाणी न्यावे. शरीराचे तापमान कमी होण्यासाठी बर्फ किंवा गार पाण्याच्या पट्ट्या शरीरावर ठेवाव्या.’ रुग्ण पूर्ण शुद्धीत नसेल, तर पाणी देऊ नये, असे राज्य साथरोग अधिकारी डॉ. आशाराणी तेलंग यांनी सांगितले. उन्हा‌ळ्याच्या दिवसांमध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही आरोग्य विभागाने केले.

यंदा राज्यात आठ मार्चपर्यंत उष्माघातामुळे चार रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी ही रुग्णसंख्या ३४७ इतकी होती, तर उष्माघातामुळे एक जणांचा बळी गेला होता. सन २०२३ मध्ये सर्वाधिक म्हणजे ३,१९१ रुग्णांना उष्माघाताचा त्रास झाला होता, तर चौदा जणांना प्राण गमवावे लागले होते. यंदा उन्हाचा तडाखा जास्त जाणवत असल्याने आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. दरम्यान, नाशिककरांनाही उन्हाचा ‘ताप’ जाणवू लागला असून, दुपारी रस्त्यावर रहदारी कमी होऊ लागली आहे.

Share This Article