घरगुती वादातून पतीने बळजबरीने पत्नीला विष पाजलं; कुटुंबाचा आक्रोश

Team Daily Yashwant
Team Daily Yashwant 77 Views 2 Min Read
2 Min Read

 बीड :  बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राजपिंपरी येथे  विवाहितेला बळजबरीने पतीने विष पाजून तिची हत्या करण्यात आली असल्याचा अंगावर काटा आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. कोमल नागेश पाटोळे असं मृत महिलेचं नाव आहे. विवाहितेचं सात वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. महिला आणि तिचा पती या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मात्र घरगुती वादातून पतीने बळजबरीने पत्नीला विष पाजलं, असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. या धक्कादायक घटनेप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. या घटनेमुळे गेवराई तालुक्यासह संपूर्ण बीड जिल्ह्यातच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

लेकीच्या मृत्यूनंतर, मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी बीड जिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला. जोपर्यंत आरोपीला अटक केली जाणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.

- Advertisement -

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेला आधी मारहाण केली. त्यानंतर तिला औषधं पाजलं. इतकंच नाही तर एका मुलाला ती जिवंत आणि की नाही हे तपासण्यासाठी पाठवण्यात आलं. तसंच विवाहितेची लहान मुलंही हिसकावून नेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. आरोपीला ताब्यात घेतलं पाहिजे, तसंच आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी मृत विवाहितेच्या कुटुंबाने केली आहे. त्याशिवाय विवाहितेच्या पतीचे बाहेर दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याचा आरोपदेखील कुटुंबीयांनी केला आहे. तसंच पती आणि दुसरी महिला यांना ताब्यात घ्यावं अशी विवाहितेच्या कुटुंबीयांची मागणी आहे.

- Advertisement -

घरगुती वादातून बळजबरीने विवाहितेला विष पाजल्याच्या या घटनेने पसिरात एकच संताप व्यक्त होत असून नागरिकांमधून महिलेच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे.

Share This Article