पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात अत्यंत थरकाप उडवणारी घटना घडली आहे. पोटच्या दोन चिमुरड्या लेकरांना आईनेचे पहाटेच्या साखर झोपेत गळा दाबून मारल्याची घटना घडली. या क्रूर महिलेने आपल्या पतीवर देखील कोयत्याने वार केले. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली मधील शिंदे वस्ती या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली. पती-पत्नीच्या वादातून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. आज (8 फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. दौंड पोलिसांनी आरोपी कोमल दुर्योधन मिढे या 30 वर्षीय महिलेला ताब्यात घेतलं आहे. शंभू दुर्योधन मीढे (वय 1 वर्ष) आणि पियू दुर्योधन मीढे (वय 3 वर्ष) अशी मयत मुलांची नावे आहेत. या महिलेने तिचा पती दुर्योधन आबासाहेब मीढे (वय 35 वर्ष) याच्यावरही कोयत्याने मानेवर व हातावर वार करून जखमी केलं आहे.

