अंगावर शिंकला म्हणून तोंडावर सॅनिटायझर टाकून पेटवलं, अल्पवयीन मुलाच्या कृत्याने मुंबईत खळबळ

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 17 Views 1 Min Read
1 Min Read

मुंबई: अंगावर शिंकल्याने एका अल्पवयीन मुलाने शिंकणाऱ्या मुलाच्या तोंडावर सॅनिटायझर टाकून पेटविल्याची घटना अंधेरीच्या डी. एन. नगर परिसरात घडली. या घटनेत मुलाचा चेहरा आणि कान भाजला असून आग लावणाऱ्या अल्पवयीन मुलास पोलिसांनी पकडले असून त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.

- Advertisement -

अंधेरी परिसरात वास्तव्यास असलेला १६ वर्षांचा मुलगा फारूक (बदललेले नाव) बुधवारी सायंकाळी नमाजासाठी जातो असे सांगून घरातून बाहेर पडला. काही वेळातच फारूक हा आपल्या मित्रांसोबत रडतच घरी परतला. त्याचा चेहरा आणि कानाचा काही भाग जळालेला दिसला. याबाबत आजीने विचारले असता फारुकने परिचयातील एका अल्पवयीन मुलाचे नाव घेतले. फारूक आणि त्याचा मित्र मोबाइलवर व्हिडीओ बघत उभे होते. त्यावेळी हा मुलगा या ठिकाणी येऊन उभा राहिला. याचवेळी फारुकला शिंक आली आणि तो अल्पवयीन मुलाच्या अंगावर शिंकला. याचा राग आल्याने अल्पवयीन मुलगा घरी गेला. त्याने सॅनिटायझर आणि लायटर सोबत आणले. फारूक याच्या तोंडावर सॅनिटायझर टाकून लायटरने पेटविले. फारूक सोबतच्या मुलाने पाणी टाकून आग विझवली.

- Advertisement -

आजीने फारूक याला कूपर रुग्णालयात दाखल केले आणि याबाबत डी. एन. नगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. या मुलास बालसुधारगृहात ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -
Share This Article