बारशाआधीच बाळाचं पितृछत्र हरपलं

Team Daily Yashwant
Team Daily Yashwant 36 Views 2 Min Read
2 Min Read
The baby lost his father's umbrella before he was twelve.

मुलाच्या नामकरणापूर्वीच वडिलांच्या अकाली ‘एक्झिट’ मुळे नागपूरमधील बुटीबोरीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी रात्री संरक्षक भिंत तोडून कार विहिरीत गेल्याने सूरज सिद्धार्थ चव्हाण (वय ३४), त्याचा भाऊ साजन सिद्धार्थ चव्हाण (२७) आणि संदेश भरत चव्हाण (वय २७, रा. साईताजनगर, बुटीबोरी) या तिघांचा मृत्यू झाला. तिघांच्या मृत्यूने चव्हाण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

- Advertisement -

एकाच वेळी दोन भावांच्या मृत्यूचा चव्हाण कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. सूरज आणि साजन बुटीबोरीतील कंपनीत काम करायचे. एक वर्षापूर्वी सूरजचे लग्न झाले. त्याला एक महिन्याचा मुलगा आहे. चव्हाण कुटुंबाने त्याच्या नामकरण सोहळ्याची तयारी सुरू केली होती. मात्र, मुलाच्या नामकरणापूर्वी काळाने सूरज व त्याच्या भावावर झडप घातली. शवविच्छेदनानंतर तिघांच्या पार्थिवावर एकाच वेळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच सूरजने नवीन कार खरेदी केली. तो साजन व संदेशला कार चालवायला शिकवित होता. घटनेच्या दिवशी नेमकी कार कोण चालवित होता, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, बुटीबोरीनजीकचे जंगल व मैदानांतील विहिरींना लोखंडी सुरक्षा कठडे अथवा जाळ्या लावा, अशा सूचना पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केल्या.

- Advertisement -

बालभारती मैदान हे एमआयडीसीच्या अंतर्गत येते. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी विहिरीला आवश्यक ते सुरक्षा कठडे अथवा लोखंडी जाळी का लावली नाही? सुरक्षेच्या आवश्यक त्या उपयायोजना का केल्या नाहीत ? अशी विचारणा करीत ‘तिघांच्या मृत्यूस आपणास का जबाबदार धरण्यात येऊ नये, याचा खुलासा करावा’, असे निर्देश पोलिस अधीक्षकांनी बुटीबोरी एमआयडीसीला दिले.

Share This Article