चहापानावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांसाठी आता सुपारी पान ठेवू

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 27 Views 2 Min Read
2 Min Read

नागपूर: राज्याचं हिवाळी अधिवेशन  उद्या 7 डिसेंबरपासून नागपूर इथं होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला. विरोधकांसाठी आता सुपारी पान ठेवायला हवं. विरोधकांना विदर्भ मराठवाड्यासाशी काहीही देणं घेणं नाही हे त्यांच्या भूमिकेवरून दिसतं, असं फडणवीस म्हणाले. विरोधी पक्षांच्या दुपारच्या पत्रकार परिषदेत काही नेते झोपले होते, जसे ते तीन राज्यात झोपले, अशी कोपरखळी फडणवीसांनी लगावली.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून चक्रीवादळामुळे देशाच्या विविध भागात पाऊस होत आहे. त्यामुळे हवामान विभागाने महाराष्ट्रातही पावसाची शक्यता ही त्या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे आणि जवळपास पाच जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देखील या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. आजच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व यंत्रणेला अलर्ट राहण्याचा सल्ला दिलेला आहे. त्यासोबत ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय किंवा होतंय. त्याठिकाणी कुठली वाट न पाहता पंचनामे करून जी काही नुकसान भरपाई आहे त्या संदर्भात राज्य सरकारकडे मागणी करण्याच्या संदर्भात देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी आज प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

विरोधकांसाठी सुपारी पान ठेवावे लागेल

आमच्या चहापानावर बहिष्कार घातला. चहापान हे चर्चेकरता होत असतं. पण कदाचित विरोधी पक्षाचा स्वभाव पाहता पुढच्या वेळेस सुपारी पान ठेवावे लागेल म्हणजे कदाचित ते येतील अशी शक्यता मला दिसते.

- Advertisement -

आज विरोधी पक्षाने न येण्याची कारणे आणि जे पत्र दिलेला आहे, मगाशी मी बघितलं की त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काही लोक झोपी गेले होते. म्हणजे तीन राज्यात जसे झोपले तसे. पत्रकार परिषदेतील काही लोक झोपी गेले होते पण तशाच झोपेत हे पत्र लिहिले आहे का असा प्रश्न पडावा अशा प्रकारचे पत्र विरोधी पक्षाने दिलं आहे.

मला आश्चर्य वाटतं नागपूरचं अधिवेशन विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा व्हावी, मराठवाड्याच्या प्रश्नावर चर्चा व्हावी याकरता खऱ्या अर्थाने अधिवेशन या ठिकाणी होत असतं. पण विरोधी पक्षाच्या पत्रामध्ये विदर्भ मराठवाड्याच्या समस्यांचा उल्लेखच नाहीये. विरोधी पक्षाला विदर्भ मराठवाड्याचा संपूर्ण विसर पडलेला आहे, असं या पत्रावर न दिसतं.

Share This Article