तब्येत खालावली, रात्रभर उपचार; तरीही जरांगे सभेवर ठाम

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 25 Views 2 Min Read
2 Min Read

बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्राचा दौरा करणाऱ्या मनोज जरांगे यांची सोमवारी बीडच्या अंबेजोगाईच्या सभेत प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना अंबेजोगाईच्या थोरात हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांना ताप आला होता आणि प्रचंड अशक्तपणा देखील असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. असे असतांना आजच्या नियोजित सभांना उपस्थित राहण्याची भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे सतत वेगवेगळ्या जिल्ह्याचा दौरा करतांना पाहायला मिळत आहे. त्यांच्या अनेक सभा पहाटेपर्यंत चालल्याचे देखील पाहायला मिळाले. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांची प्रकृती खालावली आहे. सोमवारी सुरवातीला धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील माकणी-करजगाव येथील सभेत त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांनी बसूनच भाषण केले. पुढे बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील सभेत देखील त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी येथे देखील बसूनच भाषण केले. त्यानंतर त्यांना तत्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांना ताप असून, प्रचंड अशक्तपणा निर्माण झाला असल्याचे म्हटले. तसेच, त्यांनी विश्रांती घेणं महत्वाचे असल्याचे डॉक्टरांनी म्हटले होते. परंतु, मनोज जरांगे आजच्या नियोजित सभांना उपस्थित राहण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती संयोजकांकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

मनोज जरांगेंच्या आजच्या सभा…

मनोज जरांगे कालपासून बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांची अंबेजोगाईमध्ये सभा पार पडली. तसेच, त्यांच्या आजच्या दौऱ्यानुसार केज तालुक्यातील बोरी सावरगावमध्ये दहा वाजता पहिली सभा होईल. त्यानंतर एक वाजता धारूर आणि तीन वाजता माजलगावमध्ये सभा होईल. तसेच, त्यांच्या दौऱ्याचे समारोप माजलगावमधील जाहीर सभेने होणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

पुढील भूमिका 17 डिसेंबरला जाहीर करणार…

मराठा आरक्षणाचा मुदा मार्गी लावण्यासाठी सरकारने 24 डिसेंबरपर्यंत वेळ मागितली असून, त्यांना मुदत देण्यात आल्याची माहिती मनोज जरांगे यांच्याकडून देण्यात आली होती. दरम्यान, मुदत जवळ आली असतांना देखील जरांगे यांच्या अनेक प्रमुख मागण्या अजूनही मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे आता आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी 17 डिसेंबरला आंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलवण्यात आली आहे. तर, या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात येणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे या बैठकीत मनोज जरांगे यांच्यासह राज्यभरातील मराठा आंदोलक उपस्थित राहणार आहे.

Share This Article