दत्तात्रय गाडेची कुंडली आली समोर; आधी चारचाकीची लिफ्ट देऊन महिलांची लूट करायचा

Team Daily Yashwant
Team Daily Yashwant 47 Views 3 Min Read
3 Min Read

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील स्वारगेट एसटी बस स्टँडवरती शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवरती बलात्कार केल्याची संतापजनक घटना मंगळवारी घडली होती. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी हा सराईत गुन्हेगार असून तो एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची चर्चा आहे. आरोपी दत्ता गाडेवरती विविध पोलिस स्थानकामध्ये एकूण 7 गुन्हे दाखल आहेत. आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा शिरुर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आधी तो पुणे ते अहिल्यानगर अशी प्रवासी वाहतूक करत असल्याची माहिती आहे. तो प्रवासी वाहतुकीवेळी वृद्ध महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चारचाकी गाडीत बसवायचा आणि त्यांना निर्जन स्थळी घेऊन जाऊन लुबाडायचा. मात्र, एका महिलेच्या सतर्कतेमुळे त्याला पोलिसांनी पकडल्याची माहिती आहे. त्याच्यावर शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

- Advertisement -

दत्ता गाडे काही कामधंदा करत नव्हता…

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, नराधम आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा ( वय वर्षे 36, रा. शिरुर) शिरुर तालुक्यातील गुणाट या गावचा रहिवासी आहे. घरातील परिस्थिती बेताची आहे. गावामध्ये त्याचं पक्क्या बांधकामातील पत्र्याचं घर आहे. त्याची वडिलोपार्जित तीन एकर शेतजमीन देखील आहे. आई-वडील शेती काम करतात. तर दत्तात्रय रामदास गाडेला एक भाऊ आहे, पत्नी, लहान मुले देखील आहेत. असं सगळं असून देखील दत्ता गाडे काही कामधंदा करत नसे. तो कायम उनाडक्या करत फिरत असायचा. त्याला झटपट पैसे कमावायचा नाद लागला. त्या नादात त्याने चोरी, लुटमार करण्यास सुरुवात केली. महिलांना, वृध्दांना लुबाडायला सुरुवात केली, अशी माहिती परिसरातील स्थानिक ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

पुणे ते अहिल्यानगर अशी प्रवाशी वाहतूक करताना लूटमार

पोलिसांनी दत्ता गाडेबाबत माहिती देताना सांगितले की, दत्तात्रय गाडे याने 2019 मध्ये कर्ज काढून एक चारचाकी कार विकत घेतली होती. त्या कारमधून तो पुणे ते अहिल्यानगर अशी प्रवासी वाहतूक करत असे. या दरम्यान त्याने चोरी करायला सुरूवात केली होती. ज्या महिलेच्या अंगावर जास्त दागिने असतील अशा महिलांना तो लिफ्ट द्यायचा त्यानंतर तो त्यांना निर्जन स्थळी नेऊन त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील दागिने लुटत होता.

- Advertisement -

तंटामुक्ती निवडणुकीसाठी देखील उभा राहिला पण…

दत्तात्रय गाडे हा गुणाट गावाच्या तंटामुक्ती निवडणुकीसाठी उभा राहिला होता. पण, त्याचा त्या निवडणुकीमध्ये पराभव झाला. याशिवाय निवडणुकीच्या काळात त्याने एका राजकीय नेत्यासाठी निवडणुकीचं काम देखील केलं असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या सोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत.

कुठे-कुठे गुन्हे दाखल

दत्ता गाडेने 2020 मध्ये शिरूर गावाजवळच्या करे घाटात लूटमार केली होती. त्यानंतर त्याच्यावर दरोड्याचा गुन्हा देखील दाखल झाला होता. त्याला शिक्षा देखील झाली होती. शिक्रापूर येथे दोन, अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा, केडगाव व कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत. तसेच इतर गुन्ह्यांतील खटले प्रलंबित असल्याने तो मोकाट होता.

 

SOURCES: ABP Majha
VIA: ABP Majha
Share This Article