नाशिक : सिन्नर-पुणे महामार्गावरील गोंदे फाटा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसचा अपघात झाला. महाकाली ट्रॅव्हलची ही बस पुण्याकडून नाशिकच्या दिशेने येत होती. समृद्धी महामार्गावरील ‘इंटरचेंज’ पॉइंटजवळ हा अपघात झाला. अपघातात १५ ते २० जण जखमी झाल्याचे वावी पोलिसांनी सांगितले. त्यापैकी चार-पाच प्रवाशी गंभीर जखमी आहेत. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. वावी पोलिस व महामार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, पंचनामा सुरू आहे. तर जखमींना सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले आहे.