उच्चशिक्षित सरपंचाच्या शेतात जादूटोणा; खिळे-टाचण्या-लिंबूची केली होळी

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 8 Views 2 Min Read
2 Min Read

कोल्हापूर जिल्ह्यात एक अजब प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यामधील तळंदगे गावात गेल्या वर्षी संदीप पोळ हे उच्चशिक्षित तरुण लोकनियुक्त सरपंच म्हणून सरपंच पदावर निवडून आले. आज या गोष्टीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच्याच शेतात कोणी अज्ञाताने भानामती करणी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, उच्चशिक्षित असलेले संदीप पोळ यांनी जनजागृती करत अशा गोष्टींना आम्ही थारा देत नाही, असे म्हणत भानामतीमध्ये असलेल्या वस्तूंची होळी केली आहे.

- Advertisement -

कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील तळंदगे गावाची मतसंख्या चार हजारांवर आहे. या गावात गेल्यावर्षी २१ डिसेंबर २०२२ ला ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला आणि या ग्रामपंचायत निवडणुकीत तीन पॅनेलने समोरासमोर उभे ठाकल्याने अधिक रंजक बनलेल्या या निवडणुकीत २४० मतांनी विजय मिळवत पहिल्याच प्रयत्नात संदीप पोळ यांना गावकऱ्यांनी थेट सरपंचपदी निवडून दिले. तर त्यांच्या पॅनेलचे चार सदस्यही निवडून आले होते. संदीप पोळ यांना निवडणून आणण्यात गावातील महिलांचा मोठा वाटा ठरला होता. तर संदीप पोळ यांनी गावकऱ्यांचे आभार देखील मानले होते. पदभार स्वीकारल्यानंतर गावात अनेक विकासात्मक कामे देखील ते करत आहेत.

- Advertisement -

मात्र, आज या निवडणुकीच्या एक वर्षानंतर गावातील अज्ञातांनी या लोकनियुक्त सरपंच संदीप पोळ यांच्या शेतात भानामती करून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. कोणीतरी अज्ञाताने खिळे, टाचण्या, लिंबू, नारळ, गुलाल, कुंकू अशा वस्तू टाकून भानामती आणि करणी केल्याचे गावकऱ्याच्या निदर्शनास आले. यानंतर सदर व्यक्तीने ही माहिती संदीप पोळ यांना दिली. यानंतर त्यांनी स्वतः शेतात जाऊन या सर्व वस्तू एकत्र करत शेतातून बाहेर आणल्या आणि आजूबाजूला जाणाऱ्या मुलांना बोलावून याबद्दलची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. शिवाय या सर्व वस्तूंची त्यांनी होळी केली. तर करणी, जादूटोणा आणि भानामती प्रकाराला आपण घाबरत नसून महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी २०१३ सालीच कायदा बनवला आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या या पुरोगामी नगरीत अशा गोष्टी आम्हाला मान्य नाहीत असे संदीप पोळ यांनी म्हटले आहेत.

- Advertisement -

Share This Article