जिथे दहशत माजवली, तिथेच माज उतरवला; पुण्यात विठ्ठल शेलारची धिंड

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 40 Views 2 Min Read
2 Min Read

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या झालेल्या दिवसाढवळ्या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड विठ्ठल शेलारची  पुणे पोलिसांनी धिंड काढली. पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवत गुन्हेगारांची दहशत कमी करण्यासाठी जिथे लहानाचा मोठा झाला त्याच राहत्या घराच्या परिसरातून त्यांची धिंड काढली आली आहे. पिंपरीत धिंड काढल्याचा व्हिडीओ  सध्या सोशल मीडियावर व्हयरल होत आहे.

- Advertisement -

शरद मोहोळ हत्येतील दुसरा मुख्य आरोपी असलेल्या विठ्ठल शेलारचे गाव मुठा गावापासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेलं उरवडे गाव आहे. मुळशी खोऱ्यातील या लहान गावांमध्ये वर्चस्व कोणाचं राहणार यातून निर्माण वादातून शरद मोहोळची हत्या झाल्याचं समोर आले आहे.

- Advertisement -

शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी भाजपशीच संबंधित विठ्ठल शेलारला अटक करण्यात आली आहे. मुळशी तालुक्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी भाजपने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना जवळ केलं. त्यातूनच विठ्ठल शेलारला हत्या, हत्येचा प्रयत्न , खंडणी, अपहरण असे गंभीर गुन्ह्यांमधून जामीन मिळत गेले आणि 2017 साली त्याच्यावर मुळशी,भोर, वेल्हा या तालुक्यांची भारतीय जनता युवा मोर्चाची जबाबदारी सोपविण्यात आली. तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत शेलारला पक्षात जाहीर प्रवेश देण्यात आला.

- Advertisement -

कोण आहे विठ्ठल शेलार?

विठ्ठल शेलार हा मुळचा मुळशी तालुक्यातील उरवडे गावचा रहिवासी आहे.  त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. 2014  मध्ये त्याच्यावर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्याला अटकही झाली होती. 2017  मध्ये त्याची जामीनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर काहीच दिवसांत त्याने भाजपात प्रवेश केला. भाजपाने विठ्ठल शेलारवर मुळशी, मावळ आणि भोर तालुक्यांची जबाबदारी सोपवली होती. दरम्यान, विठ्ठल शेलारच्या भाजपाप्रवेशानंतर पक्षावर टीका सुरू झाली.  त्यानंतर गिरीश बापट म्हणाले होते की, आम्हाला विठ्ठल शेलारच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती नव्हती. आम्ही त्याच्यावर कारवाई करू.

पुण्यात गंभीर गुन्ह्यांची मालिका

ज्या ऐतिहासिक पुण्याला एक सांस्कृतिक शहर, विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जात होतं त्याच पुण्यात गेल्या काही वर्षांपासून आयटी क्षेत्रातील भरभराटीने पैसा आल्यानंतर जी गुन्हेगारी उभी राहिली आणि त्यातून रक्तचरित्राचा अध्याय लिहिला गेला तो पाहता परिस्थिती नियंत्रणात नसल्याचे चित्र आहे. पुण्यामध्ये खुलेआम सुरु असलेलं टोळीयुद्ध, कोयता गँग, महिला अत्याचार, खुनामुळे प्रतिमा पार मलीन झाली आहे.

Share This Article