ग्रामस्थांनी गाव काढलं विक्रीला, थेट मुख्यमंत्र्यांच्या नावाने पोस्टर

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 16 Views 3 Min Read
3 Min Read

बीड : गावात आधीच मूलभूत सोयी सुविधा नाहीत, त्यात आलेल्या योजना कागदोपत्री दाखवून बोगस बिले उचलण्यात आल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी चक्क गावच विक्रीला काढल्याचा प्रकार बीड  जिल्ह्यात समोर आला आहे. पाटोदा तालुक्यातील खडकवडी गावात राहणाऱ्या ग्रामस्थांनी चक्क गाव विक्रीला असल्याचे बॅनर लावले आहे. तर, गावात कोणत्याही सुविधा नसल्याने ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या नावाने बॅनर लावत गाव विक्री करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. एकूण 1800 लोकसंख्या असलेल्या या गावात शासनाच्या अनेक योजना कागदोपत्रीच झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. तर, गाव विक्री करण्याचे बॅनर लावल्याने या गावाची जिल्हा भरात चर्चा सुरू आहे. [Village on Sale, Beed]

- Advertisement -

पाटोदा तालुक्यातील खडकवाडी येथील ग्रामस्थांनी घेतलेल्या एका भुमिकेमुळे या गावाची बीड जिल्ह्यात चर्चा पाहायला मिळत आहे. गावात करण्यात येणाऱ्या विकास योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने, या भ्रष्टाचाराला कंटाळून ‘गाव विकणे आहे’ असा फलक गावकऱ्यांनी लावला आहे. तर, मुख्यमंत्री शिंदे यासाठी परवानगी देण्याची विंनती देखील गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. या आगळ्यावेगळ्या मागणीची सर्वत्र चर्चा होत आहे.

- Advertisement -

रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार…

खडकवाडी गावात जिल्हा परिषद अंतर्गत दलित वस्तीतील सिमेंट रस्त्याच्या कामासाठी गेल्यावर्षी 4 लाख 90 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, सिमेंट रस्ता न करताच सरपंच व सरपंच पती यांनी ग्रामसेवकावर राजकीय दबाव टाकत अपहार केला. त्यामुळे, नागरिक निधी मिळून देखील सोय सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळेच, अजून पैसे कमी पडत असतील तर खडकवाडी गाव विकून ग्रामपंचायतीला पैसे द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

काय आहे पत्रात…

मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब…
सप्रेम नमस्कार,
आपण राज्याला दिलेल्या अनेक महत्त्वकांशी योजना घेऊन महाराष्ट्र राज्य सध्या विकासाच्या वाटचालीकडे आहे. मात्र, पाटोदा तालुक्यातील खडकवाडी हे गाव विकासापासून कोसो दूर आहे. गावात आलेल्या आपल्या सर्व विकासाच्या योजना कागदोपत्रीच राबवल्या गेल्या असून, सर्व निधी परस्पर उचलण्यात आला आहे. अनेक वेळा संबंधित प्रशासनाला तक्रार देऊन देखील कसलीच कारवाई झाली नाही. गावात मूलभूत सोयी सुविधांचा अद्याप अभाव आहे. त्यामुळे आमचे गाव विकणे आहे. कृपया आमचे गाव विकण्यास अनुमती द्यावी ही विनंती….

Share This Article