जबरी चोरीतील दोघांना मुद्देमलासह अटक

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 54 Views 2 Min Read
2 Min Read

लातूर  शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी मोबाईल हिसकावणा-या जबरीचोरीमधील दोन आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे. त्यांच्याकडून ऑटोरिक्षासह १ लाख ६४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस ठाणे गांधी चौक हद्दीत २० ऑगस्ट रोजी दोन अनोळखी आरोपी ऑटोरिक्षामधून येऊन एका इसमाला अडवून जबरीने त्याच्याकडील मोबाईल व पैसे हिसकावून घेऊन ऑटोक्षामधून पळून जाण्याची घटना घडली होती. ज्या इसमाचा मोबाईल जबरीने चोरण्यात आला होता त्या इसमाने नमूद आरोपींचा पाठलाग करीत असतानाच गांधी चौक पोलिसांशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली. त्यावरुन गांधी चौक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मोबाईल हिसकावणा-या आरोपींचा पाठलाग करुन त्यांना सुभाष चौक परिसरामध्ये ऑटोरिक्षासह प्रेम विनोद उर्फ विलास जाधव, राहणार सिद्धार्थ सोसायटी लातूर, सिद्धेश्वर बालाजी जाधव, राहणार संत गोरोबा सोसायटी, लातूर या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनीच गांधी मार्केट परिसरात फिर्यादीला मारहाण करुन त्याच्याकडील मोबाईल व चौदाशे रुपये जबरीने चोरल्याचे कबूल केले.

- Advertisement -

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गांधीचौक पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अक्रम मोमीन करत आहेत. जबरी चोरीच्या घटनेची माहिती मिळताच अतिशय जलद गतीने तात्काळ कार्यवाही करत, पोलिसांनी जबरी चोरीची घटना घडल्यानंतर काही वेळातच नमूद आरोपींना ताब्यात घेऊन चोरलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेला ऑटोरिक्षा,असा एकूण १ लाख ६५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनात गांधी चौक पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक आक्रम मोमीन, अंमलदार राजेंद्र टेकाळे, राम गवारे, दामोदर मुळे, दत्तात्रय शिंदे, रणवीर देशमुख यांनी केली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

Share This Article