वरिष्ठ पोलिस निरीक्षकाने पत्नीचाच सीडीआर काढला

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 80 Views 2 Min Read
2 Min Read

पदाचा गैरवापर करून स्वतःच्याच पत्नीचे कॉल रेकॉर्ड (सीडीआर) काढणे एका पोलिस अधिकाऱ्याच्या अंगलट आले आहे. पत्नीने केलेल्या तक्रारीनंतर डोंगरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सदानंद माने यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. बेकायदा पद्धतीने सीडीआर काढून पतीने कायद्याचे उल्लंघन केले आहे, असा आरोप त्यांच्या पत्नीने केला असून सहायक पोलिस आयुक्तांमार्फत चौकशी सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

- Advertisement -

डोंगरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सदानंद माने आणि त्यांची पत्नी सायली यांच्यामध्ये घटस्फोटप्रकरणी सुनावणी आणि प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच माने यांनी खासगी गुप्तहेर आपल्या मागावर लावल्याचा तसेच पती वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने माझ्या मोबाइल क्रमांकाचे सीडीआर काढत असल्याचा आरोप करीत सायली यांनी पोलिस आयुक्त, विशेष पोलिस आयुक्तांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

- Advertisement -

कुणाच्याही मोबाइल क्रमांकाचा बेकायदा सीडीआर काढणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याने या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सायली यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी माने यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले असून सहायक पोलिस आयुक्त जोत्स्ना रासम या याप्रकरणाची चौकशी करीत आहेत.

- Advertisement -

सहायक पोलिस आयुक्तांनी विभागीय चौकशीत सदानंद माने आणि सायली माने या दोघांचेही जबाब नोंदवून घेतले आहेत. ही विभागीय चौकशी अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान पती पोलिस दलामध्ये असल्याने वारंवार पदाचा गैरवापर करून त्रास देत असल्याचे सायली यांनी म्हटले आहे. पाच वर्षांपूर्वी कुलाबा पोलिस ठाण्यात असताना एका गुन्ह्यातील आरोपीचे नाव टाकून त्यांनी माझ्या मोबाइल क्रमांकाचा सीडीआर काढल्याचे त्यांनी म्हटले आहे. तेव्हापासून आतापर्यंत अनेकदा त्यांनी हे कृत्य केल्याचे सायली म्हणाल्या. याबाबत म्हणणे जाणून घेण्यासाठी माने यांच्याशी मोबाइलवर, संदेश पाठवून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अनेकदा प्रयत्न केल्यानंतर एकदा त्यांनी प्रतिसाद दिला आणि नंतर बोलतो सांगून फोन ठेवून दिला.

सीडीआर काढण्याची प्रक्रिया

कोणत्याही मोबाइल क्रमांकाचा सीडीआर काढायचा असल्यास त्याचा रीतसर अर्ज संबंधित विभागाच्या उपायुक्तांकडे केला जातो. यामध्ये मोबाइल क्रमांक असलेल्या व्यक्तीचे नाव, सीडीआर काढण्याचे कारण, कोणत्या गुन्ह्यासंबंधात सीडीआरची गरज आहे त्याची माहिती द्यावी लागते. उपायुक्तांच्या परवानगीनंतर संबंधित क्रमांकाचे सीडीआर काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे पाठविले जाते. सीडीआर आल्यानंतर ते प्रथम उपायुक्त आणि नंतर मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याकडे पाठविले जातात.

Share This Article