नोटांचा माऊंट एव्हरेस्टच सापडला; काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 11 Views 2 Min Read
2 Min Read

रांची | 8 डिसेंबर 2023 : झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू सध्या बऱ्याच चर्चेत आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन राज्यातील अर्ध्या डझानाहून अधिक जागांवर बुधवारी छापे मारले. आयकर विभागाने झारखंड आणि ओडिशामधील बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड (दारू उत्पादन कंपनी) वर छापा टाकला आणि कंपनीशी संबंधित परिसरातून मोठ्या प्रमाणात चलनी नोटा जप्त केल्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशातील बोलंगीर आणि संबलपूर आणि झारखंडच्या रांची आणि लोहरदगा येथे शोध घेण्यात आला.

- Advertisement -

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या ठिकाणाहून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या नोटांची मोजणी करण्यात आली. पण नोटांचा डोंगर इतका प्रचंड होता, की त्या अगणित नोटा मोजता-मोजता मशीनच बंद पडलं. करचुकवेगिरीच्या संशयावरून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी साहू यांच्या मालकीच्या अनेक जागांवर छापे टाकले होते.  या कारवाईदरम्यान आयकर विभागाच्या टीमसोबत सीआयएसएफचे जवानही सामील होते.

- Advertisement -

बुधवारी या छाप्यांना सुरूवात झाली आणि खात्याच्या अधिकार्‍यांनी नोट मोजणी यंत्राचा वापर करून रोख रक्कम तपासली, असे सूत्रांनी सांगितले. साहू यांच्या घरात मारलेल्या छाप्यामध्ये सापडलेली सर्व रोकड ही बेहिशोबी असल्याचे दिसते. सापडलेल्या या सर्व नोटा बँकेत नेण्यासाठी तब्बल 157 बॅग्स खरेदी करण्यात आल्या, मात्र शेवटी त्याही कमीच पडल्या. अखेर पैसे नेण्यासाठी तेथे गोण्या आणण्यात आल्या. त्यानंतर सर्व नोटा ट्रकमध्ये भरून बँकेत नेण्यात आल्या.

- Advertisement -

धीरज साहू यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते काँग्रेसचे नेते आहेत. ते झारखंड येथून राज्यसभेचे खासदार आहेत. साहू हे स्वत: एक बिझनेसमन असून ते उद्योगपतींच्या कुटुंबातून आले आहेत. धीरज साहू यांचे भाऊ शिव प्रसाद साहू हे देखील खासदार होते. स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच साहू यांचे कुटुंब काँग्रेस पक्षाशी जोडलेले होते. 1977 साली धीरज साहू यांनी राजकारणात पदार्पण केले. 1978 साली जेलभरो आंदोलनादरम्यान त्यांना तुरूंगवासही घडला. जून 2009 साली पहिल्यांदा ते राज्यसभेवर निवडून गेले होते.

धीरज साहू हे सोशल मीडियावर बरेच सक्रीय असतात. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी संबंधित संदेश ते X (पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत असतात. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निवडणुकीशी संबंधित याचिका फेटाळल्यानंतर 2020 साली धीरज साहू हे प्रसिद्धीच्या झोतात आले. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रदीप सोथनालिया यांनी त्यांच्या निवडणुकीला आव्हान दिले होते. 2018 मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रदीप सोनथालिया यांनी धीरज साहू यांना राज्यसभेत आव्हान दिले होते.

Share This Article