शासन आपल्या दारी उपक्रमात मुख्यमंत्र्यांचा सरकारी योजनांवर भर

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 13 Views 3 Min Read
3 Min Read

हिंगोली – प्रतिनिधी

- Advertisement -

शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी हिंगोली येथील रामलीला मैदानावर रविवारी दहा मार्च रोजी तीन वाजेच्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यासपीठावर आले असता मी तुमचे दर्शन घेण्यासाठी आलो असे म्हणून शिंदे सरकारने राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांचा त्यांनी नागरिकासमोर पाढा वाचल्याने नागरिक ही कंटाळले होते.यावेळी या कार्यक्रमाला मात्र दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पाठ फिरविल्याने भाजप व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी ,कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

- Advertisement -

येथील रामलीला मैदानावर रविवारी दुपारी तीन वाजता शासन आपल्या दारी उपक्रमाची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री अब्दुल सत्तार ,खासदार हेमंत पाटील, माजी खासदार शिवाजी माने, आमदार संतोष बांगर ,तानाजी मुटकुळे, राजू नवघरे , माजी आमदार गजानन घुगे, राजश्री पाटील, विभागीय आयुक्त मधुकर राजे अरदड, जिल्हाधिकारी पापळकर , निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे ,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ अनुप शेंगुलवार आदींची उपस्थिती होती.

- Advertisement -

पुढे बोलताना शिंदे म्हणाले , हे डबल इंजिन सरकार असून दोन वर्षात वेगाने विकास करत आहे. मुंबईची वारी कमी वेळात करण्यासाठी जनशताब्दी रेल्वे सुरू केली त्यामुळे माता, भगिनींना कामासाठी चकरा माराव्या लागत होत्या त्या आता कमी झाल्या असल्याचे त्यांनी स्पस्ट केले.

शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासन आपल्या दारी उपक्रमातून आतापर्यंत २२ कार्यक्रम झाले. यामध्ये ५ कोटी ६५ हजार लोकांना लाभ मिळाल्याचे त्यांनी सांगून ,या योजनेत रेशन कार्ड, मतदान नोंदणी, पंतप्रधान मातृ वंदना , कुटुंब योजना ,लेक लाडकी, कन्या समृद्धी योजना ,जमीन भूमापन ,घरकुल , सर्व योजना एका छताखाली सुरू केल्या असल्याचे सांगताच भर सभेत शिव सैनिकाकडून घोषणाबाजी सुरू होती.

दरम्यान, माझी शाळा मुख्यमंत्री उपक्रमात राज्यातील दोन कोटी शाळांनी सहभाग घेतला असून या योजनेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याचे त्यांनी स्पस्ट केले. असं सांगून लिगो प्रकल्पासाठी २६०० कोटीच्या निधीची तरतूद केल्याने जगात हा प्रकल्प प्रसिद्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्या मुळे बाळासाहेब हळद संशोधन केंद्रासाठी १०० कोटी रुपयांचा निधी दिला. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना सोयीचे होणार आहे. यावेळी शिंदे यांनी त्याच त्याच योजनांची माहिती देऊन प्रातिनिधिक स्वरूपात दोन शेतकऱ्यांचा सत्कार केला. या सरकार मध्ये भाजप व अजित पवार गटाचे प्रतिनिधी असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी हा कार्यक्रम हायजॅक करून आपलीच पोळी भाजण्याचा प्रयत्न केला.

जिल्हा प्रशासनाचे नियोजन ढासळले..

पत्रकारांना बसण्यासाठी जागा अपुरी पडली तर व्हीआयपी कक्षात कोण कुठे बसते याचे नियोजन नसल्याने पुरता गोंधळ उडाला होता.

स्टेजवर बाया नाचविल्या

शासन आपल्या दारी उपक्रमात नागरिकांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात विविध गाण्यावर बाया थिरकल्या असून जमलेल्या नागरिकांची करमणूक करण्यात आली. परंतु जिल्हा प्रशासनाचे लाखो रुपयांचा चुराडा झाला असून याकडे कोणी फिरकले देखील नाही.

नागरिकांना भांड्याचे आमिष दाखविले

शासन आपल्या दारी कार्यक्रमात यावेच लागते तेंव्हा तुम्हाला बांध कामगार कार्यलयाकडून भाड्याची किट देतो म्हणून कार्यक्रमाला आणले असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले.

गावोगावी बसेस रिकाम्या फिरल्या

या कार्यक्रमासाठी जिल्ह्यात ३०० बसेस नागरिकांसाठी पाठविण्यात आल्या होत्या, परंतु मराठा आरक्षण संदर्भात मराठा समाजाच्या काही युवकांनी बसेस वरील पोस्टर फाडून रिकाम्याच पाठविल्याने लाखो रुपये पाण्यात गेले.

Share This Article