कधी मंदिरात जायला बंदी, कधी नळजोडणी तोडतात, आर्थिक शोषणही करतात

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 12 Views 2 Min Read
2 Min Read

विरार : चिखलडोंगरी गावात मांगेला समाजात आजही जातपंचायत अस्तित्वात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जातपंचायतीच्या पंचांनी नुकतेच सहा जणांना बहिष्कृत केलं आणि बहिष्कृत नागरिकांना २५ हजारांचा दंड आकारला. या संपूर्ण घटनेचा एक धक्कादायक व्हिडिओ देखील समोर आला आहे.

- Advertisement -

विरार पश्चिमेकडे मांगेला समाजाच्या नागरिकांचे चिखलडोंगरी गावात वास्तव्य आहे. या गावात आजही जातपंचायत अस्तित्वात आहे. या गावातील स्वयंघोषित २०-२५ पंच जातपंचायत चालवत असल्याची बाब समोर आलीये. जातपंचायतीच्या विरोधात जाणाऱ्यांना २५ हजार ते १ लाखापर्यंतचा दंड आकारला जातो.

- Advertisement -

मुरबाड तालुक्यातील सासणे येथे असलेल्या दत्ता देवस्थान वारकरी मंडळ ट्रस्टबरोबर गावातील पंचायतीचा वाद आहे. त्यामुळे चिखलडोंगरी ग्रामस्थांना सासणेला जायला बंदी आहे. मात्र गावातील दीपा वैती (४०) या सेवा करण्यासाठी सासणे गुरुपीठात गेल्याने मागील वर्षी त्यांना वाळीत टाकण्यात आले आणि २५ हजारांचा दंड आकरण्यात आला. तिच्याशी संबंध ठेवण्यास कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना मनाई करण्यात आली. दीपा वैतीची तब्येत बिघडल्याने तिचे मोठे भाऊ उमेश वैती (५०) हे सासणे येथे तिला भेटायला गेल्याने वैती यांना दंड आकारून पुन्हा वाळीत टाकण्यात आले. यावेळी त्यांना दंड न भरल्याने गावात मंदिरात जायला बंदी घातला बंदी घातली व नळ जोडणी बंद केली.

- Advertisement -

त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी दत्त जयंतीला दर्शनासाठी सासणे येथे गेलेल्या दर्शन रामचंद्रे मेहेर, (४८) रुचिता मेहेर (२१) कवेश लक्ष्मण राऊत आदी ग्रामस्थांना देखील २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. बहिष्कृत करण्यात आलेल्या नागरिकांच्या घराबाहेर आवाज देऊन हा दंड भरण्यासाठी सांगण्यात येत असल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ देखील समोर आला आहे.

जात पंचायतीची दहशत आणि गुंडगिरी वाढत असल्याने ५ ग्रामस्थांनी जात पंचायतीचे लोक गुंडगिरी करून आर्थिक शोषण करत असल्याचे आणि सामाजिक अधिकार नाकारून जगण्याचा हक्क काढून घेतला असल्याची तक्रार केली आहे. गावातील जात पंचायतीच्या ३२ जणांविरोधात ५ ग्रामस्थांनी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Share This Article