वाळूच्या डंपरची धडक अन् तिघांनी जीव गमावला

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 14 Views 2 Min Read
2 Min Read

जळगाव: जळगाव शहरातील साईनगर भागातील भक्त मध्य प्रदेशातील ओंकारेश्वरजवळ बकावा येथे शिवलिंग घेण्यासाठी क्रूझर वाहनातून जात होते. घरापासून निघाल्यानंतर अवघ्या काही अंतरावरच बांभोरीजवळ महामार्गावर त्यांच्या वाहनाला भरधाव वाळूच्या डंपरने धडक दिली. या अपघातात क्रुझरमधील ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ४ जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजता घडली. विजय हिम्मत चौधरी (वय ४०, साई नगर), तुषार वासुदेव जाधव (२८, रा. खोटे नगर) आणि भूषण सुभाष खंबायत (३५, रा.साई नगर) अशी मृतांची नावे आहेत.

- Advertisement -

जळगावातील खोटे नगर परिसरात असलेल्या साईनगर भागात शिव मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी शिवलिंग घ्यायला शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता क्रुझर गाडीने साईनगरातील ७ ते ८ जण क्रूझर गाडीने ओंकारेश्वरला निघाले होते. घरापासून अवघ्या पाच मिनिटांचा अंतरावरच बांभोरी गावाजवळ समोरून येणाऱ्या भरधाव वाळूच्या डपरने क्रुझरला जोरदार धडक दिली.

- Advertisement -

या अपघातात विजय हिम्मत चौधरी, तुषार वासुदेव जाधव आणि भूषण सुभाष खंबायत या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दिलीप साळुंखे, के. डी. पाटील, अनिल ठाकरे, बापू पाटील हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जळगाव शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाळधी पोलिस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने प्रयत्न सुरू केले होते. त्यानंतर पोलिस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

- Advertisement -

मृत भूषण खंबायत याचे साईनगर येथे प्रोव्हिजन आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. तर विजय चौधरी हे शेरी ता. धरणगाव येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत माध्यमिक शिक्षक असून त्यांच्या पश्चात आई वडील, एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. तुषार जाधव हा ड्रायव्हर असून त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी असा परिवार आहे. दरम्यान मयत झालेल्या सर्वांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात एकाच आक्रोश केला होता.

Share This Article