तीनशे रुपये द्या अन् दहावीला १० गुण मिळवा

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 19 Views 2 Min Read
2 Min Read

कोल्हापूर: अंगात कोणतीही कला नसली तरी चालेल, कोणत्याही व्यासपीठावर अभिनय, गायन, वादन केले नसले तरी चालेल, तीनशे रूपये दिला की, शासनमान्य संस्थेचे सर्टिफिकेट मिळेल, ज्यामुळे दहावीला तब्बल दहा गुण मिळतील… सध्या राज्यात सांस्कृतिक कला अकादमींचे पेव फुटले असून त्यांनी अशी दुकानदारी सुरू केली आहे. शाळादेखील यामध्ये सहभागी होऊन मुलांची आणि शाळेची टक्केवारी वाढवत आहेत. यामुळे चित्रकला स्पर्धेकडे मात्र मुले पाठ फिरवत आहेत.

- Advertisement -

दहावीच्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील नैपुण्याबद्दल तीन ते दहा जादा गुण मिळतात. त्यामध्ये इलेमेंटरी आणि इंटरमिजीएट या दोन चित्रकला स्पर्धेचा समावेश आहे. या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यास ए,बी व सी या श्रेणीनुसार सात,पाच व तीन गुण दिले जातात. याशिवाय गायन, वादन, अभिनय, क्रीडा नैपुण्य याचेही गुण मिळतात. दहावीत गुणांची टक्केवारी वाढविण्यासाठी या स्पर्धेत सहभागी होण्याची मानसिकता अधिक होती, पण अलीकडे या स्पर्धेला बसणाऱ्या मुलांची संख्या कमी होत आहे.

- Advertisement -

अभिनय, गायन, वादन यातील कोणतीही परीक्षा न देता, शिक्षण न घेता अथवा यातील काहीहीं न येणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा गुण देण्याची दुकानदारी सुरू झाली आहे. राज्यात काही शासनमान्य संस्था आहेत. शाळा आणि या संस्थांनी सध्या दुकानच थाटले आहे. शाळा त्यांच्याकडे तीनशे रुपये आणि मुलांची यादी पाठवतात. पैसे मिळाले की, या संस्था मुलांच्या नावाचे सर्टिफिकेट देतात. ते राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळात दिले की, मुलांना दहा गुण सहजपणे मिळतात. यामध्ये मुख्याध्यापक आणि संबंधित संस्थांची साखळीच तयार झाली आहे.

- Advertisement -

इलेमेंटरी आणि इंटरमिजिएट या चित्रकला स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुलांना अधिकाधिक सात गुण मिळतात. ही परीक्षा अवघड आहे. त्यामुळे कमी गुण मिळतात. यापेक्षा कोणतीही कला न शिकता, परीक्षा न देता, व्यासपीठावर कलागुण न दाखवता सहजपणे तीनशे रूपयात दहा गुण मिळत असल्याने मुले चित्रकला स्पर्धेकडे पाठ फिरवत आहेत.

Share This Article