नाव मिळालं, चिन्ह बाकी; ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ कोणत्या निवडणूक चिन्हासाठी आग्रही?

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 14 Views 2 Min Read
2 Min Read

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरच्या घडामोडींमध्ये अजित पवार गटाला पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह बहाल करणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे संस्थापक नेते शरद पवार यांच्या गटाला बुधवारी नवे नाव दिले. यानुसार हा गट आता ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ या नावाने ओळखला जाईल. मात्र, या पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.

- Advertisement -

निवडणूक आयोगाने अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय मंगळवारी दिला. आयोगाने एका आदेशात अजित पवार गटाला घड्याळ हे राष्ट्रवादीचे मूळ निवडणूक चिन्हही दिले. सहा महिने चाललेल्या दहा सुनावण्यांनंतर पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले.

- Advertisement -

आयोगाने १४१ पानी आदेशात म्हटले होते की, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी) आहे आणि त्यांनाच पक्षाचे नाव आणि ‘घड्याळ’ चिन्ह वापरण्याचा अधिकार आहे. या निर्णयानंतर आयोगाने शरद पवार गटाला बुधवारी दुपारी ४ वाजेपर्यंत तीन नावे पाठवण्याची मुदत दिली होती. नावे न दिल्यास आगामी राज्यसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवावी लागेल, असेही आयोगाने म्हटले होते.

- Advertisement -

वटवृक्ष, उगवता सूर्य की कप-बशी?

आयोगाच्या निर्देशानुसार शरद पवार गटाने बुधवारी आपल्या पक्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एस), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार ही तीन नावे निवडणूक आयोगाकडे पाठवली होती. यातील तिसऱ्या नावाला आयोगाने मान्यता दिली. निवडणूक चिन्हांबाबतही शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे तीन चिन्हांचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये वटवृक्ष, उगवता सूर्य आणि कप-बशी यांचा समावेश आहे. यातील वटवृक्ष या चिन्हासाठी शरद पवार गट आग्रही आहे.

Share This Article