मनोज जरांगे यांचा मुंबईसह विविध जिल्ह्यांचा दौरा

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 11 Views 2 Min Read
2 Min Read

जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत यापूर्वी दोनदा आमरण उपोषण करुन सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करुन घेतल्या होत्या. आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी अंतरवाली सराटी ते मुंबई असा मोर्चा देखील काढला. राज्य सरकारनं काढलेल्या अधिसूचनेनंतर २७ जानेवारीला मनोज जरांगे यांनी नवी मुंबईत विजयी गुलाल देखील उधळला होता.

- Advertisement -

आपल्या मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी २० जानेवारीपासून जालन्यातील अंतरवाली सराटीतून मुंबईपर्यंत पदयात्रा काढली होती. ते २६ जानेवारीला मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण करणार होते. मात्र, नवी मुंबईत मोर्चा दाखल झालेला असताना सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना अधिसूचनेचा मसुदा सुपुर्द केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनोज जरांगे यांनी आपले उपोषण वाशीतच सोडले होते.

- Advertisement -

मराठा आरक्षणासाठी काढलेल्या अधिसूचनेची तातडीनं अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे हे अंतरवाली सरटीत १० फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. उपोषणापूर्वी ते आळंदी(पुणे),मुंबई, नाशिक ,बीड या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.

- Advertisement -

मनोज जरांगे हे आळंदी आणि मुंबई दोन दिवसांचा दौरा करणार असून ते आज अंतरवली सराटी वरून १२ वाजता निघणार आहेत. आळंदी येथे स्वागताचा कार्यक्रम आहे, तर ७ फेब्रुवारीला मुंबईत कामोठे येथे कार्यक्रम होणार असून, जरांगेंची मुंबईत समाजाच्या लोकांशी बैठक देखील होणार आहे. ८ फेब्रुवारी आणि ९ फेब्रुवारीला नाशिक आणि बीडमधील कार्यक्रम आटोपून ते जालन्यातील अंतरवाली सराटीत दाखल होतील.

मात्र, अंतरवाली सराटीतून निघताना मनोज जरांगे यांची भूमिका सरसकट आरक्षणाची असताना सगेसोयरेच्या मुद्यावर मोर्चा थांबवण्यात आला, अशा प्रकारची मतं सोशल मीडियावर अनेकांनी व्यक्त केली होती. मनोज जरांगे यांनी सोशल मीडियावरुन आक्षेप नोंदवणाऱ्यांनी अंतरवाली सराटीमध्ये येऊन चर्चा करावी, असं आवाहन केलं होतं. आता मनोज जरांगे पुन्हा एकदा पुणे, मुंबई, नाशिक आणि बीडचा दौरा करुन उपोषणासंदर्भात भूमिका मांडण्याची शक्यता आहे.

Share This Article