मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना; दिवसभरात दुसऱ्यांदा डोळ्यात पाणी

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 18 Views 3 Min Read
3 Min Read

जालना : मराठा आरक्षणाचे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी सकाळी ११ वाजता मुंबईकडे कूच केली. यावेळी अंतरावाली सराटी येथून मराठा समाज त्यांच्यासोबत निघाला आहे. मनोज जरांगे अंतरावाली सराटीतून निघाल्यावर पुन्हा भावूक झाले. शनिवारी सकाळापासून दुसऱ्यांदा त्यांच्या डोळ्यात आश्रू आले. यावेळी बोलताना त्यांनी आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. २६ जानेवारीला मुंबईतील गल्ली गल्लीत मराठा दिसणार आहे. आता मला गोळ्या घातल्या तरी मी मागे हटणार नाही. मी मरण्यास भीत नाही. समाजासाठी मी लढत राहणार आहे. मराठ्यांनी आरक्षण घेण्यासाठी माझ्यामागे पुन्हा एकदा ताकदीने उभे राहा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील केले.

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे रवाना झाले आहे. त्यामुळे राज्यभरात देखील मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन होण्याची शक्यता लक्षात घेता, पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहे. याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पत्र काढण्यात आले आहे. ज्यात 20 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत सर्व पोलीस अधिकारी, अमलदार यांच्या साप्ताहिक सुट्टीसह सर्व प्रकारच्या सुट्ट्या (वैद्यकीय रजा वगळून)  रद्द करण्यास घटक प्रमुखांना मान्यता देण्यात आली आहे.

- Advertisement -

पोलीस महासंचालक कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, “मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जालना ते मुंबई असा संभाव्य पदयात्रा करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्या अनुषंगाने राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेकरिता तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक बंदोबस्तासाठी 20 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत खालील नमुद घटकांमधील सर्व अधिकारी व अंमलदार (कार्यकारी व अकार्यकारी पदावरील) यांच्या साप्ताहिक सुट्टीसह सर्व प्रकारच्या रजा (वैद्यकीय रजा वगळून) बंद करण्यास घटक प्रमुख यांना मान्यता देण्यात येत आहे. तसेच घटकातील साप्ताहीक सुट्टी बंद करताना उपरोक्त संदर्भातील शासन निर्णयाचे तंतोतंत पालन करावे. तरी, घटक प्रमुख यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेकरिता सर्वोतोपरी दक्षता घ्यावी,असे म्हटले आहे.

- Advertisement -

अहमदनगर जिल्ह्यातील पोलिसांच्या तीन दिवसांसाठी सुट्या रद्द…

पोलीस महासंचालकांच्या पत्रानंतर अहमदनगर पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय सुट्ट्या वगळता इतर सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्याचा आदेश काढण्यात आला आहे. अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘अहमदनगर जिल्हयात 21 जानेवारी ते 22 जानेवारी या काळात मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी ते मौजे कोळगाव (ता. गेवराई), मीड सांगवी, पाथडी, तीसगाव, करंजी घाट, बाराबाभळी, भिगार, जी पी ओ नौक, केडगाव, सुगा, वाडेगव्हाण, गव्हाणवाडी असा अहमदनगर जिल्ह्यातून प्रवास करुन पुणे मार्गे मुंबईतील आझाद मैदान असा मराठा आरक्षण अनुषंगाने पायी दिंडी करणार आहेत. त्याकरीता जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडु नये या करीता कायदा व सुव्यवस्था व सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदोबस्तासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी,अंमलदार यांच्या साप्ताहिक सुट्टी, सर्व प्रकारच्या रजा (वैद्यकीय रजा वगळून) 20 ते 22 जानेवारी असे एकुण 3 दिवस बंद करण्यात आले आहे. तर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्टेशन व सर्व शाखा प्रभारी अधिकारी, पोलीस महासंचालक यांच्या पत्राचे अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करावी.

Share This Article