डेंग्यू रुग्णसंख्येत महाराष्ट्र देशात दुसरे, सर्वाधिक रुग्ण मुंबईत

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 5 Views 2 Min Read
2 Min Read

मुंबई : कीटकांमुळे होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव वाढला असून, डेंग्यू रुग्णसंख्या अजूनही नियंत्रणात आलेली नाही. देशात डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमाकांर आहे. मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये डेंग्यूच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. वाढते शहरीकरण, गर्दी तसेच डेंग्यू प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांचा योग्य पाठपुरावा न झाल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे.

- Advertisement -

जानेवारी ते नोव्हेंबर या काळात राज्यात डेंग्यूचे १७,५२८ रुग्ण आढळले. यामध्ये १०० टक्क्यांहून अधिक वाढ दिसते. सन २०२२च्या या काळात ८५७८ रुग्णांची नोंद झाली होती. यंदा राज्यात १४ जणांचा मृत्यू डेंग्यूमुळे झाला आहे. मागील वर्षी डेंग्यूमुळे जीव गमावलेल्यांची संख्या २७ इतकी होती. यंदा उत्तर प्रदेशमध्ये ३३,३१९ रुग्ण आढळले व ३० नोव्हेंबरपर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

ग्रामीण भागापेक्षा मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे या शहरी भागामध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या आहे. केवळ मुंबईमध्ये राज्यातील एकूण रुग्णसंख्येच्या एक तृतीयांश रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये ५२६१, नाशिकमध्ये १३८३ तर नागपूरमध्ये १२९५ रुग्ण आढळले. वातावरणातील बदल, साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव यामुळे रुग्णसंख्येमध्ये होणारी वाढ अधिक आहे. राज्यात डेंग्यूनिदानासाठी सव्वा लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत. करोना संसर्गानंतर राज्यामध्ये कीटकजन्य आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा वेग कमी झाला आहे. त्या दोन वर्षांमध्ये आरोग्य यंत्रणेचा भर हा करोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी होता.

- Advertisement -

यंदा मलेरियाच्या १४,२२१ रुग्णसंख्येची नोंद झाली. कीटकांकडून होणाऱ्या अन्य आजारांसाठी करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये राज्य सरकारने ११ वैद्यकीय तज्ज्ञांना डेंग्यू, मलेरियाच्या प्रादुर्भावासंदर्भातील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. बदलत्या हवामानामुळे कीटकजन्य आजारांमध्ये होणारी वाढ हा मुद्दाही आता लक्षात घेण्यात येत आहे.

Share This Article