विवेकानंद रुग्णालयासारख्या संस्था आधुनिक काळातील तीर्थक्षेत्र – सरसंघचालक डॉ.मोहन भागवत

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 20 Views 4 Min Read
4 Min Read
लातूर : विवेकानंद मेडिकल फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या विवेकानंद कॅन्सर अँड सुपर स्पेशालिटी विस्तारित हॉस्पिटलचे लोकार्पण डॉ.भागवत यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुखजी मांडविया तर प्रमुख अतिथी म्हणून मुंबईच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ.राजेंद्र बडवे यांच्यासह देवगिरी प्रांत संघचालक अनिल भालेराव, विवेकानंद मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल अंधोरीकर, वैद्यकीय संचालक डॉ. अरुणा देवधर, विश्वस्त डॉ. ब्रिजमोहन झंवर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
भारतीय संस्कृतीला वैद्यकीय सेवेची मोठी परंपरा आहे. सर्वच क्षेत्रात वारसा आहे. तरीही आपण आजवर पाश्चात्य देशांचं अनुकरण करत होतो. त्याऐवजी आपला वारसा पुढे चालवत संशोधन करून भारतीयांना आरोग्य क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. देशातील नागरिक स्वस्थ असले तर भारत विश्वगुरू बनेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ.मोहन भागवत म्हणाले की, आरोग्य हा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.’सर्वेपि सुखिन: संतु’  ही भारतीय परंपरा आहे. त्याच दृष्टीने आपल्या पूर्वजांनी काम केले. आरोग्य क्षेत्रातही आपण पुढारलेले होतो परंतु त्याच्या नोंदी आपल्याकडे नव्हत्या. परकीय आक्रमणे झाल्यानंतर आपण थांबलो. या काळात जग आपल्या पुढे गेलं. नंतर त्यांनी केलेल्या संशोधनाचा गवगवा झाला. डॉ.मोहन भागवत म्हणाले की, भारतीय परंपरा अतिशय प्राचीन आहे.काळाच्या कसोटीवर ती उतरलेली आहे. त्यात संशोधन करत त्याच्या नोंदी करणे गरजेचे आहे. आजवर आपण पाश्चात्य मंडळींचे अनुकरण करत गेलो. त्याऐवजी अनुभव घेऊन त्याचा स्वीकार करावा, असेही ते म्हणाले. रुग्णाला पाहून त्याला बरे करणे ही आपली संस्कृती आहे तर रोग पाहून त्यावर औषध देणे ही पाश्चात्यांची पद्धत आहे.रुग्णांना बरे करणे हा आपला धर्म आहे.चिकित्सा हा डॉक्टरांचा धर्म असून व्यवसाय नाही. आरोग्य सेवेसाठी भविष्यात नव्या तंत्रज्ञानाची मदत गरजेची आहे. भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी ‘वसुधैव कुटुंबकम’ या भावनेतून सेवा करण्याची आवश्यकता आहे. अशी सेवा केली तर आपल्या स्वप्नातील विश्वगुरू भारत बनवणे शक्य होणार आहे.
विवेकानंद रुग्णालयासारख्या संस्था आधुनिक काळातील तीर्थक्षेत्र आहेत. इथे ऊर्जा असून इथल्या वातावरणातून प्रेरणा मिळते. या प्रेरणेतूनच काम करण्यास बळ मिळते, असेही डॉ.मोहन भागवत यांनी सांगितले.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आपल्याकडे ब्रेन व मेन पॉवर असून त्याला विल पॉवर सोबत जोडण्याची आवश्यकता व्यक्त केली. या विल पॉवरमुळेच कोरोना सारख्या संकटातूनही आपण बाहेर येऊ शकलो.सेवा हे आपल्या देशाचे आरोग्य मॉडेल आहे. इतर देशात तो व्यवसाय आहे. इतर देशांच्या तुलनेत आरोग्यावरील आपला खर्च कमी असला तरीही आपली आरोग्यव्यवस्था सुदृढ आहे. आपल्याकडे सेवाभावातून रुग्णावर उपचार केले जातात. विवेकानंद सारख्या रुग्णालयातून रुग्णावर मोफत उपचार होतात.हेच भारताचे मॉडेल आहे. भारतीय जीवनशैली ही अनेक रोगांवर औषध आहे.आपले राहणीमान, एकत्र कुटुंबपद्धती मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. आपल्याकडे श्रमाला महत्त्व आहे.योग ही भारताचीच देण आहे. सुश्रुत पासून आपली आरोग्यव्यवस्था किती बळकट होती हे दिसून येते. आरोग्य क्षेत्रात आपल्याला विरासत लाभलेली आहे.कोरोना काळात आपण इतर देशांनाही वाजवी दरात औषध पुरवठा केला. सेवाभावातून केलेल्या या कामामुळेच देशाचे सामर्थ्य वाढत आहे.विवेकानंद रुग्णालयासारख्या संस्थांचा त्यात मोठा वाटा असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
तत्पूर्वी मार्गदर्शन करताना डॉ.राजेंद्र बडवे म्हणाले की,वेस्ट इज बेस्ट हा विचार मनातून काढून टाका.पाश्चात्त्यांपेक्षा आपल्याकडील उपचार अधिक चांगले आहेत. पाश्चात्त्य देशांना ईस्ट इस बेस्ट असे वाटते.पाश्चात्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे कर्करोगाचे प्रमाण कमी आहे. शहरीकरणासोबतच कर्करोग वाढत आहे. विवेकानंद रुग्णालय उपचाराच्या बाबतीत टाटा कॅन्सर हॉस्पिटल पेक्षा कुठेही कमी नाही.या संस्थेला मदत करण्याची संधी मिळाली हे भाग्यच आहे,असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी अनिल अंधोरीकर,डॉ.अरुणा देवधर,डॉ.ब्रिजमोहन झंवर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.डॉ.झंवर यांनी प्रास्ताविकातून विवेकानंद कॅन्सर अँड सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील सुविधांची माहिती दिली. संस्थाध्यक्ष अनिल अंधोरीकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कमलाक्षीच्या विश्व कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

- Advertisement -

Share This Article