भारताने विजयासह रचला इतिहास

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 42 Views 3 Min Read
3 Min Read

राजकोट : राजकोटवर अखेर भारताचेच राज्य असल्याचे पाहायला मिळाले. कारण भारताच्या गोलंदाजांची इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडले आणि विजय साकारला. यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात ४ बाद ४३० धावसंख्या उभारली आणि डाव घोषित केला. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी ५५७ धावांचे आव्हान देण्यात आले आहे. भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून इंग्लंडच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. त्यामुळे इंग्लंडचा संघ बॅकफूटवर ढकलला गेला. त्यानंतर दडपणाखाली इंग्लंडचे फलंदाज बाद होत गेले आणि भारताने ४३४ धावांनी दमदार विजय साकारला. या विजयासह भारताने कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. रवींद्रसजडेजाने यावेळी दुसऱ्या डावात पाच बळी मिळवले.

- Advertisement -

कसोटीच्या तिसऱ्या दिवशी यशस्वी जैस्वालची बॅट चांगलीच तळपल्याचे पाहायला मिळाले. यशस्वीने यावेळी धमाकेदार फटकेबाजी करत द्विशतक झळकावले. यशस्वीचे हे सलग दुसरे द्विशतक ठरले. यशस्वीने यावेळी १४ चौकार आणि १२ षटकारांच्या जोरावर नाबाद २१४ धावांची खेळी साकारली. यशस्वीला यावेळी सर्फराझ खानने चांगली साथ दिली. सर्फराझने दुसऱ्या डावातही अर्धशतक साकारले. सर्फराझने यावेळी ६ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ६८ धावा केल्या. भारतीय क्रिकेट संघाने रविवारी ऐतिहासिक कामगिरी केली. इंग्लंडवर ४३४ धावांनी विजय नोंदवला. भारताने कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच चारशेहून अधिक धावांनी विजय नोंदवला. इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर आहे. इंग्लंडने मालिकेतील पहिली कसोटी २८ धावांनी जिंकली होती. त्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत १०६ धावांनी बाजी मारली होती. अर्थात, या पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली. त्यानंतर राजकोटला झालेल्या तिसऱ्या कसोटीत कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता होती. भारताने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या. मात्र, भारताला मोठा फटका बसला.

- Advertisement -

फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आई आजारी असल्याने कसोटी सोडून घरी परतला होता. तरीही भारतीय संघाने इंग्लंडचा डाव ३१९ धावांत रोखला आणि पहिल्या डावात १२६ धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने यशस्वी जयस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर ४ बाद ४३० धावांवर डाव घोषित केला होता. त्यामुळे इंग्लंडसमोर विजयासाठी ५५७ धावांचे अशक्यप्राय वाटणारे लक्ष्य आले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवातीलाच ४ बाद २८ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर जो रूट आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, जडेजाने रुटला पायचीत केले आणि ही जोडी फोडली. त्यानंतर इंग्लंडचा डाव स्थिरावला नाही. अखेरीस इंग्लंडचा डाव १२२ धावांत गारद झाला आणि भारताने ४३४ धावांनी विजय नोंदवला. आजपर्यंतचा भारताचा धावांनी सर्वांत मोठा विजय ठरला. यापूर्वी, २०२१मध्ये भारतीय संघाने वानखेडे स्टेडियममध्ये न्यूझीलंडवर ३७२ धावांनी विजय नोंदवला होता.

- Advertisement -

Share This Article