करोडो वर्षे जुन्या रावण मंदिरात इतिहास रचला जाणार; कधीच घडलं नाही, ते आज घडणार

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 7 Views 2 Min Read
2 Min Read

लखनऊ: दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा जिल्ह्यातील ग्रेनो येथील बिसरखमध्ये रावणाचं मंदिर आहे. या गावात चक्क रावणाचं मंदिर आहे. इथले ग्रामस्थ कधीही रावणाच्या पुतळ्याचं दहन करत नाहीत. या गावात कधीच दसऱ्याचं आयोजन केलं जात नाही. मात्र यंदा या गावातील रावणाच्या मंदिरात राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. अयोध्येतील मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जात असताना बिसरखमधील मंदिरात राम दरबार उभारला जाईल.

- Advertisement -

रावण मंदिराचं अस्तित्व त्रेतागुगापासूनचं आहे. हे मंदिर कोट्यवधी वर्ष जुनं आहे. ब्रह्मांचे मानसपुत्र पुलस्तमुनी आणि त्यांचे पुत्र महर्षी विश्वेश्वा यांच्यासह संपूर्ण कुटुंबाची कलाकृती मंदिराच्या बाहेरील भिंतीवर आहेत, अशी माहिती मंदिराचे पुजारी विनय भारद्वाज यांनी दिली. काल या मंदिरात राम लक्ष्मण सीता यांच्यासह हनुमानाची मूर्ती बसवण्यात आल्या. या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्याला गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज या मंदिरात भंडारा आयोजित करण्यात आला आहे.

- Advertisement -

बिसरखचे ग्रामस्थ रावणाला आपला पूर्वज मानतात. गावचा पुत्र समजतात. ग्रामस्थ रावणाच्या मंदिरात पूजाअर्चा करतात. इथे एक शिवलिंग आहे. रावणाचे आजोबा पुलस्तमुनी यांनी हे शिवलिंग बसवलं होतं. रावणाचा जन्मदेखील याच गावात झाला आणि त्यानं याच मंदिरात शिवलिंगाची पूजा करुन भगवान शंकरांना प्रसन्न केलं. त्यानंतर रावणानं त्याचा सावत्र भाऊ कुबेराकडून लंका बळजबरीनं घेतली आणि मग तो लंकेत राहू लागला, अशी आख्यायिका सांगितली जाते.

- Advertisement -

बिसरखमध्ये रावणाचा जन्म झाला. तो याच गावचा पुत्र होता, असं स्थानिक मानतात. रावणाचा मृत्यू कधीच झाला नव्हता. त्यामुळे तो मेला आहे, असं आम्ही मानत नाही. रावण संपला नाही, तर त्याचा केवळ अहंकार, गर्व संपला, असं आम्ही मानतो, असं रावण मंदिराचे पुजारी विनय भारद्वाज यांनी सांगितलं. रावण आजही आमच्यात जिवंत आहे. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी गावात कोणीही आनंद साजरा करत नाही, अशी माहिती भारद्वाज यांनी दिली.

Share This Article