महाराष्ट्रासह देशातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 17 Views 2 Min Read
2 Min Read

सध्या कुठं उन्हाचा चटका जाणवत आहे, तर कुठं अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) तडाखा बसत आहे. महाराष्ट्रातही तशीच परिस्थती आहे. अनेक भागात अवकाळी पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, आजही देशातील काही भागासह महाराष्ट्रात (Maharashtra) अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात आज अवकाळी पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

- Advertisement -

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच रविवारपर्यंत जम्मू, काश्मीर, लडाखमध्ये, तर रविवारी हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.

- Advertisement -

राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. अनेक ठिकाणी आंबाच्या बागांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात झाडावरील आंबे वादळी वाऱ्यामुळं आणि पावसामुळं खाली पडले आहेत. तर दुसरीकडं लिंबू आणि भाजीपाला पिकांचं देखील मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. यामध्ये वर्धा आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळं या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. तर राज्यातील इतर काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. त्यामुळं या पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी त्यांच्या कामांचं योग्य ते नियोजन करावं जेणेकरुन वादळी पावसाचा फटका बसणार नाही. तसेच नागरिकांनी बाहेर पडताना योग्य ती खबदारी घ्यावी अशं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

Share This Article