अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून मातृत्व लादले

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 11 Views 1 Min Read
1 Min Read

अमरावती : राज्यात महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत असताना आता अमरावतीमध्ये मन सुन्न करणारा प्रकार उघडकीस आला आहे. इथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून मातृत्व लादण्यात आले. ही घटना दर्यापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित रामजीलाल चव्हाण (२५) रा. बकाजन, मध्यप्रदेश असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. भैसदेही तालुक्यातील रहिवासी एक गृहस्थ मजुरीनिमित्त काही महिन्यांपूर्वी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एका गावात आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या १६ वर्षीय मुलीलासुद्धा आपल्यासोबत आणले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुलीने पोट दुखत असल्याचे वडिलांना सांगितले.

- Advertisement -

यामुळे वडिलांनी तिला दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे तिने मुलीला जन्म दिला. प्रसूती झालेली मुलगी अल्पवयीन असल्याने डॉक्टरांनी याबाबत दर्यापूर पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी रुग्णालय गाठून पीडित मुलीचे बयान नोंदविले.

- Advertisement -

यावेळी तिने रोहित चव्हाण याने आपल्याला आमिष दाखवित वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी आरोपी रोहित चव्हाणविरुद्ध बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, या प्रकरणाचे घटनास्थळ हे भैसदेही तालुक्यातील असल्याने हा गुन्हा तेथील ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

Share This Article