आम्ही मारलं तरी मागे हटणार नाही: मनोज जरांगे पाटील

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 34 Views 3 Min Read
3 Min Read

छत्रपती संभाजीनगर: आम्ही ओबीसी कुणबी हे सिद्ध झालं मग आम्हाला उगाचच स्वतंत्र आरक्षणाच्या फुफाट्यामध्ये कशाला टाकत आहात, असं आमचं म्हणणं आहे. नाही तर पोरांचे हाल होतील. आम्ही ते नाकारलं नाही पण ते आरक्षण टिकलं पाहिजे, ही भूमिका सरकारने घेतली पाहिजे. नाही तर तोच पाढा पुन्हा वाचावा लागेल. सरकार आम्हाला २० तारखेपर्यंत आरक्षण देईल, असे वाटत नाही. त्यामुळे आम्ही मुंबईला जात आहोत. आम्ही मुंबईत पोहोचल्यानंतर मराठा समाज हा वारुळातील मुंग्यांसारखा बाहेर पडेल. मग तिकडे आम्हाला मारलं तरी आम्ही मागे हटणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. ते बुधवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

- Advertisement -

छत्रपती संभाजी नगर शहरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, आम्ही मागासवर्ग आयोगाचे मुद्दे वाचले, ते खूप मोठं आहे. आमचं नियोजन पण सुरू आहे. तो ५० टक्क्यांच्या वरचा प्रश्न आहे. मुंबईतील मोर्चासंदर्भात व मार्गासंदर्भात उद्या सविस्तर माहिती देऊ. आम्ही मुंबईला चालत जाणार आहोत. आम्ही मरायलाही तयार आहोत. मात्र, सरकारने ठरवलं ते सरकार करते. जनतेच्या मनाप्रमाणे होत नाही. अंतरवाली सराटीत उपोषण सोडताना त्यांनी जे शब्द दिले त्या शब्दाला जागा. अन्यथा आम्ही मुंबईला जाण्यासाठी ठाम आहोत, असे जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितले. मी शेंडगे यांच्याबद्दल बोलणार नाही. दबाव फिबाव नाही. आम्ही हक्काचं मागत आहे. धनगर आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी शक्ती लावावी इकडे तिकडे शक्ती वाया घालू नये. ते जेष्ठ नेते आहेत. आमदार अडवले की नाही ते मला माहित नाही, कुणी अडवले माहीत नाही. त्यांच्या त्यांच्यात चालत ते आमच्यावर घालतात. केंद्र सरकारकडून पाठ थोपटण्यासाठी आमच्यावर कारवाई केली जात असेल. एकट्याला खुश ठेवण्यासाठी हे सगळं सुरू आहे. मात्र मराठ्यांशिवाय पर्याय नाही, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

अयोध्येत होणारा राममंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा हा देशाचा सोहळा आहे. मी त्याच संस्कृतीचा आहे. मी देवाला मानतो, त्याची भक्ती करतो. पण मला आडवं जाणाऱ्याला सोडत नाही. कोणी कुठेही आनंद साजरा करु शकतो. आमचं आंदोलन हे गेल्या पाच महिन्यांपासून सुरु आहे. गेल्यावेळच्या आंदोलनानंतर ५४ लाख लोकांना लाभ झाला आहे. आता पुढच्या आंदोलनासाठी २० तारीख ठरली आहे. केंद्र सरकारला काय सांगावं, ते मोठी माणसं आहेत. पंतप्रधान मोदी शिर्डीला आले तेव्हा त्यांना मराठा आरक्षणाविषयी सांगितलं, पण त्यांना महत्त्व वाटलं नाही. मग मराठा समाजाने पुन्हा पुन्हा अपमान करुन का घ्यावा? आमचंही काहीतरी स्टेटस आहे. आता अंतरवाली सराटीसारखा प्रयोग करुन नका, ते तुम्हाला जड जाईल. आझाद मैदानासाठी आम्ही अद्याप अर्ज केलेला नाही, आता तो करु. मुंबईतील मराठा बांधवांना माझी एकच विनंती आहे की, सगळ्यांनी गटतट तोडून एकत्र या, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.

- Advertisement -

Share This Article