१७ व्या दिवशी बेमुदत उपोषणाची सांगता

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 35 Views 2 Min Read
2 Min Read

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या १६ दिवसांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची कोंडी अखेर फुटली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी फळांचा रस प्राशन करत मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले. गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात सातत्याने चर्चा सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी सरकारला काही दिवसांचा अवधी देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, राजेश टोपे, संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर हे सर्वजण अंतरवाली सराटी येथे दाखल झाले. याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी फळांचा रस पिऊन आपल्या उपोषणाची सांगता केली.

- Advertisement -

यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. मनोज जरांगे पाटील म्हणाले, “राज्यातील ही पहिली घटना आहे म्हणून कौतुक करायला हवे. आतापर्यंत जे कधीच घडलं नाही, ते आज घडलं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मराठा आरक्षणाच्या विषयात लक्ष घालून आमरण उपोषण सोडवायला जालन्यात आले. त्यांचे मराठा समाजाच्या वतीने त्यांचं टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत.”

- Advertisement -

“या टाळ्यांचा विजय होईल हा शब्द देतो. तुमची टाळी वाया जाणार नाही. मी २९ ऑगस्टला आंदोलन सुरू झालं तेव्हापासून प्रत्येकवेळी सांगत होतो की, मराठा समाजाला न्याय देऊ शकणार असेल, तर फक्त एकनाथ शिंदे,” असं मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं.

- Advertisement -

“मला माझा समाज प्रिय आहे हे मी आधीपासून सांगत होतो. समाजाच्या हिताचा निर्णय घेईन आणि त्याशिवाय मागे हटणार नाही हे मी प्रत्येकवेळी सांगितलं आहे. तीच भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आहे. त्यांनीही आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही, असं सांगितलं आहे,” असंही मनोज जरांगेंनी नमूद केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपोषणस्थळी आल्यावर जरांगे पाटील यांचे वडिलही मंचावर आले. मुख्यमंत्र्यांनी त्यांची ख्यालीखुशाली विचारली. मनोज जरांगे पाटील यांना ज्यूस दिल्यावर मुख्यमंत्र्यानी जरांगे पाटलांच्या वडिलांनाही ज्यूस दिला.

मराठा आरक्षणाची लढाई यशस्वी केल्याशिवाय मी माघार घेणार नाही. माझा बाप अजूनही कष्ट करतो, मी त्याच्या कष्टाची जाणीव ठेऊन मराठा समाजाशी कधीच गद्दारी करणार नाही. भ्रष्टाचाराचे आरोप मी कधीच सहन करणार नाही, असं सांगताना मराठा समाजबांधवांनी कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

Share This Article