एकतर आरक्षण येईल नाही तर माझं मरणच – मनोज जरांगे पाटील

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 23 Views 2 Min Read
2 Min Read

मुंबई  : मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलनाची पूर्ण तयारी केली आहे. मनोज जरांगे मुंबईत आमरण उपोषण करणार आहेत. यावेळी त्यांनी मराठा समाजातील लाखो बांधावांना मुंबईत बोलावलं आहे. मिळेल त्या वाहनाने या, येताना आपलं रेशनपाणी सोबत आणा. कुणाच्याही भरवश्यावर बसू नका, अशा सूचना देतानाच आता ही शेवटची लढाई आहे. आता एक तर आरक्षण मिळेल नाही तर माझा मृतदेहच येईल, असा निर्वाणीचा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

- Advertisement -

ही शेवटची लढाई आहे. मुंबईत इतक्या ताकदीने धडक द्या, इतक्या ताकदीने धडक द्या की मुंग्यांसारखे मराठे धडकले पाहिजे. मुंगीलाही जायला जागा राहणार नाही, इतकी प्रचंड गर्दी करा. पण शांततेत या. कोणीही शब्द मोडायचा नाही. शांततेत करोडोच्या संख्येने या. हे शेवटचं आंदोलन आहे. एक तर आरक्षण घेऊ, नाही तर माझं मरणच होईल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

- Advertisement -

तर लेकरांचे हाल होतील

आरक्षण मिळेल नाही तर मरण पत्करेल. त्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. आपल्यासाठी कोणी नाही. आपल्या बापजाद्यांनी अनेकांना मोठं केलं. पण आम्हाला मोठं करण्यासाठी कोणीच पुढे येत नाही. मग ते कशाचे आपले नेते? आपण आपल्याच लेकरासाठी लढायचं आहे. नाही तर आपल्या लेकरांचे खूप हाल होतील, असं मनोज जरांगे म्हणाले.

- Advertisement -

नोंदी मिळाल्या, कायदा पारीत का नाही?

या आधीही आम्ही सरकारला तीन महिन्याचा वेळ दिला. नंतर चाळीस दिवस नंतर दोन महिने. त्याही वेळेत सरकारने आरक्षण दिलं नाही. नोंदी मिळाल्या. आम्ही आधी चार दिवसाचा वेळ दिला होता. कायदा पारित करण्यासाठी वेळ दिला पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही वेळ दिला. आता 54 लाखांच्या नोंदी सापडल्या आहेत. मग कायदा पारीत करून आरक्षण देण्यात अडचण काय आहे? हेच आमचं म्हणणं आहे. 54 लाख लोकांच्या नोंदी सापडल्याने त्यांचं कल्याण झालं. त्यांना आरक्षण मिळालं. मराठ्यांच्या एकजुटीचा हा विजय आहे. पण आम्हा सर्वांना आरक्षण पाहिजे. त्यावर आम्ही ठाम आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Share This Article