दाऊद १००० टक्के ठणठणीत; विषबाधेच्या चर्चा निराधार – छोटा शकील

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 12 Views 2 Min Read
2 Min Read

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पुन्हा एकदा चर्चेत आहे. दाऊदला पाकिस्तानात कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर पाकिस्तानमध्ये कोणीतरी त्याच्यावर विषप्रयोग केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात होता. प्रकृती अचानक बिघडल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केल्याचं बोललं जात होतं. दाऊदची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु असल्याच्याही चर्चा आहेत. परंतु दाऊदचा जुना सहकारी छोटा शकीलने दाऊदच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या चर्चा उडवून लावल्या असून तो ठणठणीत असल्याचा दावा केला आहे.

- Advertisement -

दाऊदला ना विषबाधा झाली आहे, ना त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दाऊद ‘भाई’ एक हजार टक्के ठणठणीत आहे. त्याच्या मृत्यूच्या बातम्या निरर्थक आणि निराधार आहेत, असं छोटा शकीलने सोमवारी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितलं.

- Advertisement -

मुंबई पोलिसातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही दाऊद मरणासन्न अवस्थेत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. दाऊदशी संबंधित विविध सूत्रांशी संबंधित बातम्यांची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला असता, दाऊद फक्त जिवंतच नाही, तर सुखरुप असल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानातील रुग्णालयात तो गेला असेलच, तर केवळ जुन्या आजारांवरील उपचारासाठी, असं म्हटलं जात आहे.

- Advertisement -

मुंबईतील डोंगरी भाग एकेकाळी दाऊदचा अड्डा होता. त्याचे काही सहकारी आजही मुंबईत डोंगरी, पायधुनी आणि इतर काही ठिकाणी आहेत. संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, दाऊदला विषबाधा झाल्याची कोणतीही माहिती त्यांना येथून मिळालेली नाही. गेल्या पंधरवड्यात २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या साजिद मीर याच्यावर पाकिस्तानात विषप्रयोग झाल्याचं वृत्त पसरलं, तेव्हा मुंबई पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांनी असं म्हटलं, की पाकिस्तान आपलाच नागरिक साजिद मीरला ठार मारु शकतं, ते कधी दाऊदलाही विष देऊ शकतात.

…तर छोटा शकील घरी बसलाच नसता

एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सूत्रांद्वारे दाऊदचा जवळचा सहकारी छोटा शकीलचा पाकिस्तानमधील ठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला. छोटा शकील त्याच्याच घरात असल्याची माहिती समोर आली आहे. या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, दाऊदला काही झालं असतं, तर छोटा शकील त्याच्या घरात बसला नसता. रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी मुंबईतील दाऊदच्या नातेवाईकांच्या घरांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक जणांकडून माहिती घेण्यात आली, पण दाऊदचा मृत्यू झाला किंवा त्याला विषबाधा झाली आहे, अशी कोणतीही चर्चा कुटुंबात आढळून आली नाही.

 

Share This Article