आंध्रात धडकलं चक्रीवादळ, मिचॉन्गचा विध्वंस सुरुच

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 7 Views 2 Min Read
2 Min Read

मिचॉन्ग चक्रीवादळ  मंगळवारी आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवर  धडकलं आहे. आंध्र प्रदेश किनारपट्टीवर भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. चक्रीवादळामुळे  मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे शहर आणि जवळपासच्या गावांना जोरदार तडाखा बसला आहे. अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. 5 डिसेंबरला दुपारी दीड ते अडीच वाजेच्या सुमारास तीव्र चक्रीवादळाला आंध्र प्रदेशात बापटलाच्या दक्षिणे किनारपट्टीवर लँडफॉल झाला. यावेळी वाऱ्याचा वेग 90-100 किमी प्रतितास होता. लँडफॉलनंतर मिचॉन्ग चक्रीवादळात कमकुवत झालं आहे. पण, आजपासच्या भागात वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस सुरु आहे.

- Advertisement -

लँडफॉलनंतर मिचॉन्ग कमकुवत

चक्रीवादळ ‘मिचॉन्ग’ आंध्र प्रदेशातील मध्य किनारपट्टीवरील धडकल्याने थोडं कमकुवत झालं आहे. आंध्र प्रदेशातील बापटलापासून अंदाजे 100 किमी उत्तर-वायव्य आणि खम्ममच्या 50 किमी आग्नेयेकडे चक्रीवादळाचा लँडफॉल झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, येत्या काही तासात चक्रीवादळाची तीव्रता आणखी कमी होईल, पुढील सहा तासांत चक्रीवादळाचा कहर कमी होईल, असा अंदाज आहे.

- Advertisement -

चक्रीवादळामुळे 14 जणांचा मृत्यू

चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, चेन्नई, तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. चेन्नई, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये झाडे कोसळणे आणि विजेच्या धक्का लागण्याच्या अनेक दुर्घटना समोर आल्या आहेत. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तामिळनाडूमध्ये दोन, आंध्र प्रदेशमध्ये तीन, चेन्नईमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. चेन्नईमध्ये नऊ जिल्ह्यांतील 61,600 हून अधिक लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आल्याची माहिती, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. स्टॅलिन यांनी दिली आहे.

- Advertisement -

मिचॉन्ग चक्रीवादळ सध्या उत्तरेकडे सरकत आहे आणि येत्या काही तासांत ते आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे. मात्र, या काळात मुसळधार पाऊस सुरूच राहील,” अशी माहिती आंध्र प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (APSDMA) ने दिली आहे. चक्रीवादळ उत्तरेकडे सरकल्याने अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान अंदाज एजन्सी सूचित करते की 6 डिसेंबर रोजी उत्तर किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशात एकाकी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तेलंगणात मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि 6 डिसेंबर रोजी दक्षिण छत्तीसगड, दक्षिण किनारपट्टी आणि लगतच्या दक्षिण आतील ओडिशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ओडिशाच्या दक्षिणेकडील जिल्हे मंगळवारी रात्री सतर्क होते.

Share This Article