अंधारात रस्त्याचा अंदाज हुकला अन् कुटुंबच संपलं; दुचाकीच्या अपघातात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 29 Views 1 Min Read
1 Min Read

हिंगोली :  जिल्ह्यात  एका दुचाकीच्या अपघातात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील डिग्रस वाणी गावाच्या शिवारामध्ये दुचाकीच्या अपघातामध्ये आई-वडिलांसह मुलाचाही मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. आकाश कुंडलिक जाधव, कलावती जाधव आणि कुंडलिक जाधव असे मयत व्यक्तींचे नाव आहेत.

- Advertisement -

हिंगोलीच्या डिग्रस वाणी गावातील रहिवासी असलेले आकाश जाधव हे काल सायंकाळी आपल्या आई कलावती जाधव आणि वडील कुंडलिक जाधव यांना घेऊन वैद्यकीय कामानिमित्त रुग्णालयात निघाले होते. दरम्यान, अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे डिग्रस वाणी गावाच्या शिवारात त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात कोसळली. या अपघातामध्ये आकाश जाधव यांच्यासह त्यांच्या आई-वडीलांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे अपघात रात्रीच्या सुमारास घडला आणि या रस्त्यावरून जास्त रहदारी नसल्यामुळे जाधव कुटुंबाला रात्री कुणाचीही मदत मिळाली नाही. दरम्यान, आज सकाळी हा अपघात उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण वाणी गावावर शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू झाल्याने या घटनेबद्दल गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

डिग्रस वाणी गावाच्या शिवारामध्ये दुचाकीच्या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी याची माहिती अपघातग्रस्त यांच्या कुटुंबियांना देऊन, मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तर, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी देखील घटनास्थळी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

Share This Article