मुंबईत आठ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा मेल, यंत्रणांमध्ये खळबळ

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 21 Views 1 Min Read
1 Min Read

मुंबई: वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रासह आठ महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले असल्याचा ई-मेल शुक्रवारी संबंधित संस्थांना आला आणि एकच खळबळ उडाली. या सर्व ठिकाणी कसून तपासणी करण्यात आली, मात्र अखेर ही धमकीच निघाली. बॉम्बची अफवा पसरवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे.

- Advertisement -

कुलाब्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्र आणि भायखळा येथील प्राणिसंग्रहालयासह आठहून अधिक ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ई-मेल शुक्रवारी एका अनोळखी व्यक्तीने पाठवला. या सर्व महत्त्वाच्या संस्थांना एकाच मेल आयडीवरून धमकी देण्यात आली. या आठ ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले असून त्यांचा कधीही स्फोट होईल असे या मेलमध्ये नमूद करण्यात आले होते. या धमकीनंतर छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालायासह इतर ठिकाणी पोलिसांनी बॉम्बशोधक आणि नाशक पथकाच्या मदतीने तपासणी केली. संशयास्पद असे काहीच न आढळल्याने ही धमकी केवळ अफवाच असल्याचे स्पष्ट झाले.

- Advertisement -

मुंबईत गेल्या वर्षभरापासून धमकीचे फोन आणि मेल येण्याचे सत्र सुरूच आहे. हीदेखील अफवा असल्याने ई-मेल पाठविणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ५०५ (१) (ब) (नागरिकांमध्ये भीती किंवा दहशत निर्माण करण्याच्या हेतूने अफवा पसरवणे), ५०६ (२) (गुन्हेगारी धमकी) आणि इतर कलमांतर्गत कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

- Advertisement -

 

Share This Article