बच्चू कडू आक्रमक, भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 25 Views 2 Min Read
2 Min Read

प्रहारचे आमदार बच्चू कडू सध्या मुंबईत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या घराबाहेर आंदोलन करत आहेत. सचिन ऑनलाईन गेमिंगची (Online Gaming) जाहीरात करतो आणि याच मुद्द्यावरुन बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बच्चू कडूंसह आंदोलन करणाऱ्या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, ऑनलाईन गेमिंगची जाहीरात करत असल्याच्या मुद्द्यावरुन बच्चू कडू यांनी यापूर्वीही सचिन तेंडुलकरवर नाराजी व्यक्त केली होती.

- Advertisement -

बच्चू कडू म्हणाले की, “खरं तर आम्हाला बरेच फोन, मेसेज येत आहेत. काही ठिकाणी तर पैसा गुंतवून या जुगारावर लावला आहे. ऑनलाईन गेमिंगची तुम्ही जर जाहीरात करताय, तर मग मटक्याचीही करा, ते कशाला सोडताय? भारतरत्न असल्यामुळे आम्ही आंदोलन करत आहे. ते फक्त क्रिकेटर असते तर आम्ही आंदोलन केलं नसतं. या देशात भगतसिंहांना भारतरत्न मिळाला नाही, अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळाला नाही, महात्मा फुलेंना मिळाला नाही. मग ज्यांना भारतरत्न मिळाला ते जर गैरफायदा घेत आहेत.”

- Advertisement -

“सचिन तेंडुलकरचे चाहते खूप आहेत. त्यामुळे ते करत असलेल्या जाहीरातीचा परिणाम लहान मुलांपासून सगळ्यांवर होत आहे. त्यामुळे आमची साधी मागणी आहे की, तुम्ही जाहीरातीतून बाहेर निघावं किंवा मग भारतरत्न परत करावा. हे जर झालं नाही, तर येणाऱ्या गणेशोत्सवात आम्ही प्रत्येक गणेशमंडळात दानपेटी ठेवणार आहोत. 10 दिवस ही दानपेटी गणेशमंडळात ठेवणार. त्यानंतर त्या सर्व दानपेट्यांमधील रक्कम एकत्र करुन सचिन तेंडुलकरांना देणार” , असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

- Advertisement -

ऑनलाईन गेमिंगच्या जाहीरातींमुळे भावी पिढीवर गंभीर परिणाम होत आहे. कित्येक उदाहरणं आहेत. ऑनलाईन गेमिंगमुळे आत्महत्या झाल्यात, हत्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारतरत्न असूनही अशा गोष्टीची जाहीरात करणं हे सचिन तेंडुलकर यांना शोभत नाही, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत. आम्हाला क्रिकेटपटू म्हणून त्यांचा अभिमान आहे, पण भारतरत्न म्हणून जर ते अशा जाहीराती करत असतील तर ते मात्र मान्य नाही, असंही बच्चू कडू म्हणाले.

“ऑनलाईन गेमिंगच्या जाहीराती कोणीही करु, पण आपण अशा जाहीरातींपासून लांब राहिलं पाहिजे. गरीब, मध्यमवर्गीय समाजच या गेमिंगमुळे होरपळून निघाला आहे. बऱ्याच राज्यांमध्ये अशा गेमिंगना बंदी घालण्यात आली आहे. अशातच आपल्या राज्यातही अशा गेमिंगवर बंदी घालावी अशी विनंतीही आम्ही मुख्यमंत्र्यांना करणार आहोत. तसेच, तरुणांनाही आमचं आवाहन आहे, ऑनलाईन गेमिंगपासून दूर राहा, अशा जाहीरातींना बळी पडू नका”, असं आवाहनही बच्चू कडू यांनी केलं आहे.

Share This Article