अशोक चव्हाणांचा राजीनामा ही पक्षासाठी धोक्याची घंटा -भाई जगताप

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 34 Views 2 Min Read
2 Min Read

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसच्या पक्षसदस्यत्त्वाचा राजीनामा दिला. यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे. अशोक चव्हाणांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेसच्या गोटात प्रचंड खळबळ माजली आहे. चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर पक्षातील अंतर्गत खदखद आता चव्हाट्यावर आली आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी अशोक चव्हाणांचा राजीनामा ही पक्षासाठी धोक्याची घंटा असल्याचे म्हटले आहे. इतके मोठे नेते पक्ष का सोडून जातात, याचा काँग्रेस नेतृत्त्वाने गांभीर्याने विचार केला पाहिजे. किंबहुना हा विचार यापूर्वीच करायला पाहिजे होता, असे खडेबोल भाई जगताप यांनी सुनावले. सोमवारी ‘एबीपी माझा’शी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -

चव्हाण यांच्या दोन पिढ्यांनी काँग्रेस पक्षाची सेवा केली, नेतृत्त्व केले. अशोक चव्हाण यांनी अशाप्रकारे जाणे, हा धक्का आहे. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्त्वाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे. मुंबई आणि महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष सहा महिन्यांपूर्वी बळकट  होता. मग गेल्या सहा महिन्यांमध्ये काय घडलं, याचा विचार झाला पाहिजे. अशोक चव्हाण यांच्यासारखे मोठे नेते पक्ष का सोडून जात आहेत, याचा केंद्रीय नेत्यांनी यापूर्वीच गांभीर्याने विचार करायला पाहिजे होता. हे जे काही घडतंय ते पक्षासाठी ट चांगले नाही. यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होते. याच अस्वस्थेतून मुंबईतील काँग्रेसच्या आठ ते नऊ नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता हा त्याचा विचार जपण्यासाठी पक्षासोबत असतो. तो स्वत:च्या खिशातील पैसे मोजून पक्षाचे काम करतो. त्यामुळे पक्षाचा कार्यकर्ता म्हणजे कोणाचा नोकर नसतो. मुंबई काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये ही भावना तीव्र आहे. वर्षा गायकवाड आणि नाना पटोले यांच्याकडून कार्यकर्त्यांना योग्य वागणूक  मिळत नाही. त्यांना तुच्छपणे वागले जाते. फक्त जवळच्या लोकांचे म्हणणे ऐकले जाते. या सगळ्यामुळे मुंबई काँग्रेसचा माजी अध्यक्ष म्हणून मला पक्षाची प्रचंड चिंता वाटते, असे भाई जगताप यांनी म्हटले. भाई जगताप यांच्या या वक्तव्यावर  काँग्रेसचे इतर नेते काय प्रतिक्रिया देणार, याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

Share This Article