जोपर्यंत मेंदूवर परिणाम होत नाही तोपर्यंत वय वाढल्याची चिंता करायची नाही

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 23 Views 2 Min Read
2 Min Read

बारामती : वय वाढले हे ठीक आहे परंतु आपण जेष्ठत्वाकडे झुकलो तेव्हा कदाचित आपले पाय दुखतील, गुडघे दुखतील, दात दुखतील परंतु त्याचा आपल्या डोक्यावर परिणाम होत नाही, म्हणजेच मेंदूवर परिणाम होत नाही. हा मेंदू जोपर्यंत सशक्त आहे तोपर्यंत आपल्याला वय वाढण्याचे, चिंता करण्याचे कारण नाही, अशी फटकेबाजी खुद्द बारामतीत करून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले. जेष्ठ नागरिक हे समाजाचा ठेवा आहेत. तो ठेवा असाच जपण्याची गरज आहे, असे भावनिक मतही त्यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

निमित्त होते, बारामतीतील ज्येष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे… अनौपचारिक गप्पांसाठी शरद पवार आले होते. त्यांच्या आगमनाप्रसंगी उपस्थितांनी त्यांच्या नावाचा गजर करून त्यांना पाठिंबा दर्शवला. ज्येष्ठ नागरिकांची संख्या या कार्यक्रमाला बरीच होती. या कार्यक्रमात शरद पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पवार म्हणाले, आता ज्येष्ठांच्या ओळीत मी पण बसतो. कारण आता माझं वय देखील ८४ झालं आहे. जेष्ठ नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले पाहिजेत. ज्येष्ठ नागरिकांचा मोठा वर्ग असून देशाच्या उभारणीत त्यांचाही मोठा वाटा आहे. नव्या पिढीला ज्ञान देणारे घटक म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते.

- Advertisement -

“एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, जेव्हा मी कृषिमंत्री पदाचा पदभार स्वीकारला, तेव्हा आपण धान्य आयात करत होतो आणि जेव्हा मंत्रिपद सोडलं तेव्हा आपण जगातल्या अकरा देशांना धान्य निर्यात करत होतो. आपल्याकडे आधी कापसाच्या जिनिंग मिल होत्या. तसेच अनेक गुऱ्हाळे होती. त्यानंतर जाचक, घोलप आणि माझे वडील तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती कारखान्याची उभारणी केली. त्यानंतर सोमेश्वर कारखाना मुकुटराव काकडे यांनी स्थापन केला. त्यानंतर माळेगाव कारखाना सुरू झाला आणि या दरम्यानच्या काळामध्ये येथील गुऱ्हाळे गेली आणि कारखानदारी वाढीस लागली. इथून सगळे परिस्थिती बदलायला लागली फक्त परिस्थितीच बदलली नाही तर नागरिकांची क्रयशक्ती देखील वाढली”.

- Advertisement -

Share This Article