व्हायरल न्यूमोनियाच्या रुग्णसंख्येत वाढ, रुग्णांत गंभीर स्वरूपाची लक्षणं

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 54 Views 2 Min Read
2 Min Read
Viral Pneumonia

पुणे : वातावरणातील बदलांमुळे शहरात सर्दी, ताप, खोकला या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता विषाणूजन्य (व्हायरल) न्यूमोनियाच्या रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. त्यातून लहान मुले लवकर बरी होत असून, ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असणाऱ्यांना बरे होण्यासाठी जास्त वेळ लागत आहे. या पार्श्वभूमीवर न्यूमोनियाची लक्षणे तत्काळ ओळखणे अत्यंत महत्त्वाचे असून, वेळेवर उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

- Advertisement -

रुग्णांत २५ टक्क्यांची वाढ

दिवाळीतील हवा प्रदूषणामुळे विषाणूजन्य आजार वाढल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहरात थंडीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात चढउतार होत आहे. त्यामुळे विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरवर्षी हिवाळ्यात न्यूमोनियाचे रुग्ण आढळून येत असतात. यंदा मात्र, न्यूमोनियाच्या रुग्णांत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे.

- Advertisement -

रुग्णांत गंभीर स्वरूपाची लक्षणे

सध्या बहुतांश रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासारखी स्थिती नाही. मात्र, मधुमेह, हृदयविकार, वजन जास्त असलेले, ज्येष्ठ नागरिकांना उपचारांसाठी दाखल करावे लागत आहे. न्यूमोनिया हा श्वसनमार्गाचा आजार असून, विषाणू, जीवाणू किंवा बुरशी संसर्गामुळे फुप्फुसांमध्ये संसर्ग होतो, असेही डॉक्टरांनी सांगितले. ससून रुग्णालयातील श्वसनरोग विभागाचे प्रमुख डॉ. संजय गायकवाड म्हणाले की, ‘गेल्या आठवड्यापासून न्यूमोनियाच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. काही रुग्णांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसून येत आहेत.’

- Advertisement -

लक्षणे काय?

  1. श्वास घेण्यास त्रास होणे.
  2. हृदयाच्या ठोक्यांचे प्रमाण वाढणे.
  3. ताप येणे, कफ होणे, उलट्या होणे.
  4. छातीत दुखणे.
  5. डायरिया होणे.

सध्या विषाणूजन्य न्यूमोनिया आणि इन्फ्लुएंझाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. काही रुग्णांमध्ये ‘रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस’ची (आरएसव्ही) लक्षणे दिसून येत आहेत. तरीही रुग्ण अतिदक्षता विभागामध्ये दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. न्यूमोनियाची लक्षणे तात्काळ ओळखणे उपचारांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दर वर्षी पावसाळ्यात ‘फ्लू’ची लस घेणे गरजेचे आहे.

– डॉ. प्राची साठे, प्रमुख संचालक, अतिदक्षता विभाग, रुबी हॉल क्लिनिक

Share This Article