अंबादास दानवे नाराज; थेट मातोश्रीवर मनधरणीचे प्रयत्न

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 17 Views 2 Min Read
2 Min Read

लोकसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार असून, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटातून  मोठी बातमी समोर येत आहे. महाविकास आघाडीत  ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे  यांना छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून  उमेदवारी देण्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे अंबादास दानवे पुढील दोन- तीन दिवसांत मोठा निर्णय देखील घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दानवे यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना थेट मातोश्रीवर बोलावून त्यांची मनधरणी करण्याचा देखील प्रयत्न झाल्याचं वृत्तएका दैनिकाने दिले आहे. योगायोग म्हणजे महाविकास आघाडीतील एक मोठा नेता शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट  यांनी केले आहे.

- Advertisement -

संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अंबादास दानवे इच्छुक आहेत. यापूर्वी देखील त्यांनी तसे बोलवून दाखवले होते. महाविकास आघाडीत संभाजीनगर मतदारसंघ ठाकरे गटाकडेच राहणार असल्याचे देखील जवळपास निश्चित आहे. दरम्यान, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, दानवे यामुळे नाराज असल्याची माहिती मिळत आहे. कारण स्वतः दानवे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. दानवे यांची नाराजी लक्षात घेत त्यांना थेट मातोश्रीवर बोलवण्यात आले होते. तसेच तुमची प्रचारासाठी राज्यात गरज असल्याचे त्यांना सांगण्यात आले. सोबतच संजय राऊत यांच्याकडून देखील दानवे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाल्याचं वृत्त आहे.

- Advertisement -

एकीकडे अंबादास दानवे नाराज असल्याचे वृत्त येत असतानाच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी सूचक वक्तव्य केले आहे. “महाविकास आघाडीतील एक बडा नेता एक- दोन दिवसांत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याच संजय शिरसाट यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते.

- Advertisement -

दरम्यान या सर्व चर्चेवर एका दैनिकाला प्रतिक्रिया देतांना अंबादास दानवे म्हणाले की, ‘लोकसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे. आपण अशी मागणी देखील पक्षाकडे केली आहे. यावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही. मी निष्ठावंत शिवसैनिक असून,  संघर्ष हा माझ्यासाठी नवीन नाही. त्यामुळे भविष्यात काय घडू शकते हे आताच सांगता येणार नसल्याचे’ दानवे म्हणाले आहेत.

Share This Article