शाळेतून पायी घरी जाणाऱ्या विद्यार्थ्याला ट्रॅक्टरची धडक; विद्यार्थी जागीच ठार

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 25 Views 2 Min Read
2 Min Read

सिल्लोड: शाळेतून पायी घरी जाणाऱ्या एका विद्यार्थ्याला पाठीमागून ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात विद्यार्थी जागीच ठार झाला. हा अपघात मंगळवारी म्हसला फाटा- सोनाप्पावाडी रस्त्यावर घडला. मयूर गणेश राजपूत (वय १२, रा. सोनाप्पावाडी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. संग्राम सरदारसिंग लकवाल (रा. सोनाप्पावाडी) असे ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे.

- Advertisement -

मयूर राजपूत हा भराडी (ता. सिल्लोड) येथील सरस्वती भुवन प्रशालेत शिक्षण घेत होता. तो दररोज सोनाप्पावाडीहून म्हसला फाट्यावर पायी यायचा आणि तेथून बसने भराडीला शाळेत जा-ये करीत असे. मंगळवारी दुपारी तो नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर फाट्यावर उतरून घरी जात होता. याच दरम्यान एक विनापासिंग ट्रॅक्टर पाठीमागून आला. या ट्रॅक्टरने त्याला पाठीमागून जोराची धडक दिली. यात मयूर जागीच ठार झाला. अपघातानंतर चालक ट्रॅक्टरासह पळून गेला.

- Advertisement -

अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक सचिन क्षीरसागर, बिट जमादार विष्णू कोल्हे यांनी धाव घेऊन मृतदेह सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणला. या अपघाताची ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शानाखाली सचिन क्षीरसागर करीत आहेत. अपघात घडताच नागरिकांनी धाव घेऊन माहिती पोलिसांना दिली.

- Advertisement -

पोलिस घटनास्थळी पोहचताच ग्रामस्थ आक्रमक झाले आणि चालकाला अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त केला. आरोपीला लवकरच अटक करू, असे सांगून ग्रामस्थांना समजावले. मृत विद्यार्थ्यांवर मंगळवारी रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This Article