शेतकऱ्याने भंगारापासून बनवला ट्रॅक्टर

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 31 Views 2 Min Read
2 Min Read

गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं. कारण माणसाला जेव्हा एखाद्या साधनाची कमतरता भासते तेव्हा तो काहीही जुगाड करुन ती उपलब्ध करतो. शिवाय आपल्या देशात तर असे जुगाड करणाऱ्या लोकांची कमतरता नाहीये. कारण असे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहात असतो. ज्यामध्ये आपलं अवघड काम सोपं करण्यासाठी लोक विविध जुगाड करत असतात. सध्या बिहारमधील एका शेतकऱ्याने असाच एक जबरदस्त जुगाड केला आहे. जो पाहिल्यानंतर नेटकरी त्याचे खूप कौतुक करत आहेत. हो कारण या शेतकऱ्याने जुगाड तंत्राने एक अप्रतिम ट्रॅक्टर बनवला आहे, तो देखील भंगारातूल वस्तूंपासून आणि विशेष म्हणजे त्याचा जुगाड आजूबाजूच्या गावांमध्ये एवढा लोकप्रिय झाला आहे की लोक त्याला असेच ट्रॅक्टर बनवण्यासाठी ऑर्डर देत आहेत.

- Advertisement -

एका रिपोर्टनुसार, नवीन ट्रॅक्टर घेण्यासाठी विनोद नावाच्या शेतकऱ्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी स्वतः ट्रॅक्टर बनवण्याचा निर्णय घेतला आणि ‘जुगाड तंत्र’ वापरुन असे अप्रतिम काम केले की इंजिनिअर्स देखील त्यांचे चाहते झाले आहेत. कारण त्यांनी घरातील निरुपयोगी ‘पंपिंग सेट’च्या इंजिनपासून हा ट्रॅक्टर तयार केल्याचे सांगिंतलं जात आहे. विनोद यांचे वय ५० असून ते सिवान जिल्ह्यातील फुलवारिया गावचे रहिवासी आहेत. त्यांनी जुगाडापासून ‘३५० HP’ चा ट्रॅक्टर बनवला आहे, जो पूर्णपणे लोखंडी आहे.

या ट्रॅक्टरचे गीअर्स, फ्लायव्हीलपासून ते बॉक्सपर्यंत, लोखंडाचे बनलेले आहेत. मात्र, ट्रॅक्टरचे पुढचे चाक लोखंडाचे नाही. विनोद यांनी स्वतः वेल्डिंग करून ट्रॅक्टरची फ्रेम तयार केली आणि पंपिंग सेट मशीनचे इंजिन जोडून त्याला ट्रॅक्टरचा आकार दिला. तर हा ट्रॅक्टर १ लिटर तेलात जवळपास ८ ते ९ गुंठे शेत नांगरू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे. तर त्यांनी या ट्रॅक्टरसाठी दोन लाख रुपये खर्च आल्याचं सांगितलं आहे. शिवाय त्यांना आता असे ट्रॅक्टर बनवण्याच्या ऑर्डर्स देखील मिळत आहेत.

Share This Article