सांगली संस्थानच्या गणेश मंदिरासमोरच तरुणाचा निर्घृण खून

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 34 Views 2 Min Read
2 Min Read

सांगली : गजबजलेल्या संस्थानच्या गणेश मंदिराच्या (Ganesha Temple) दारात तरुणाचा कोयता, चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला. राहुल संजय साळुंखे (वय १९, रा. जामवाडी, सूर्यवंशी प्लॉट, सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे. या हल्ल्यात साळुंखे याचा मित्र तेजस प्रकाश कारंडे (२१, रा. जामवाडी) गंभीर जखमी आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात (Government Hospital) उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

काल रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडल्याने खळबळ उडाली. दर्शनासाठी मोठी गर्दी असता झालेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. पूर्वीच्या वादातून हा हल्ला झाला असावा, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून, त्यांच्या शोधासाठी तत्काळ पथके रवाना केली आहेत.

- Advertisement -

घटनास्थळ व पोलिसांकडून (Police) मिळालेली माहिती अशी, आज स्वामी समर्थ प्रकट दिनामुळे मंदिर परिसरात गर्दी होती. मागील बाजूला दर्शनानंतर गणरायाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होती. मृत राहुल साळुंखे आणि त्याचा मित्र तेजस कारंडे दुचाकी (एमएच ०२ ए ८३०८) वरून गणपती मंदिराजवळ आले. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर त्यांनी दुचाकी लावली. त्यावेळी त्यांच्या पाळतीवर असणाऱ्या दोघांनी क्षणात राहुल याच्या पोटात एकापाठोपाठ एक चाकू आणि कोयत्याने भोसकले.

- Advertisement -

त्यावेळी त्याला वाचविण्यास आलेल्या तेजस कारंडेच्या डोक्यावरही हल्लेखोरांनी वार केला. जीवाच्या आकांताने राहुल मंदिरासमोर असणाऱ्या नारळ विक्रेत्याच्या दुकानाच्या दिशेने पळत सुटला आणि तेथेच रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने जागेवरच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर हल्लेखोरांनी पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकाराने चौकात गोंधळ उडाला होता. त्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली.

शहर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, निरीक्षक संजय मोरे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासाच्या सूचना दिल्या. दरम्यान, घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला पूर्वीच्या वादातूनच झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला. त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक संशयिताच्या शोधासाठी तत्काळ रवाना झाले. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ आणि श्‍वान पथकास पाचारण करण्यात आले होते. श्‍वान परिसरातच घुटमळले.

Share This Article