जवळजवळ 50 ते 60 महिलांनी दीपक केसरकरांचा मार्ग रोखून धरला

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 33 Views 3 Min Read
3 Min Read
Highlights
  • महिलांनी आधी घेराव घातला, मग जाब विचारला

सिंधुदुर्ग : मागील अनेक दिवसांपासून आपल्या मागण्यासाठी आंदोलन करत असलेल्या महिलांना भेटण्यासाठी गेलेल्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. आंदोलक महिला यांनी केसरकर यांना घेराव घालत थेट जाब विचारल्याने आणि महिलांची आक्रमक भूमिका पाहता केसरकरांनी काढता पाय घेत स्वतःची सुटका करून घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीत हा प्रकार घडला आहे.

- Advertisement -

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना आंबोलीतील संतप्त महिलांनी घेराव घालून जाब विचारल्याचा प्रकार समोर आला आहे. आंबोलीत वन जमिनीच्या जागेत अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या मुद्द्यावरून आंबोली ग्रामस्थ गेल्या 18 दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. आंबोलीतील जंगलात काळोखात हे ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. आज 18 व्या दिवशी दीपक केसरकर यांनी आंदोलन स्थळी भेट दिली.

- Advertisement -

दीपक केसरकर भेटीला आले असता संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी स्थानिक आमदार म्हणून तुम्ही ही बांधकाम कधी काढणार असा प्रश्न उपस्थित करत केसरकर यांना जाब विचारला. यावेळी जवळजवळ 50 ते 60 महिलांनी दीपक केसरकर यांचा मार्ग रोखून त्यांना घेराव घातला. यावेळी दीपक केसरकर यांना पोलीस बंदोबस्तातून तिथून काढता पाय घ्यावा लागला. दरम्यान यानंतर दीपक केसरकर यांनी अनधिकृत झालेले बांधकाम लवकरात लवकर पाडण्याचे आदेश आपण देऊ अशा पद्धतीची माहिती दिली आहे.

- Advertisement -

या सर्व प्रकरणावर बोलतांना दीपक केसरकर म्हणाले की, वनसदृश जमिनीवर कोणत्याही प्रकारे बांधकाम करता येत नाही. असे असतांना देखील या भागात बांधकाम झाले असल्याने, ते बांधकाम काढण्याची गावकऱ्यांची मागणी आहे. आता यात काही स्थानिक लोकांची देखील घरे बांधलेली आहे. त्यामुळे त्यांना देखील कोणतेही त्रास होऊ न देता हा प्रश्न सोडवला पाहिजे. दरम्यान, वन क्षेत्रात कोणतेही बांधकाम करता येत नसल्याने या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच नोटीस दिल्यास 48 तासांत काही लोकं न्यायालयात जाऊन यावर स्टे आणतील असेही काही लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे उद्याच्या उद्याच मी न्यायालयात एप्लीकेशन सादर करण्याचे सांगणार असल्याचे केसरकर म्हणाले.

आंबोलीत वन जमिनीच्या जागेत झालेल्या बांधकामावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी मागील काही दिवसांपासून गावकरी आंदोलन करत आहेत. दरम्यान, याच आंदोलकांच्या रोषाला केसरकर यांना सामोरे जावे लागले. आंदोलन करणाऱ्या महिला आक्रमक झाल्याने आणि त्यांनी घेरावा घातल्याने शेवटी पोलीस बंदोबस्तात केसरकरांना तेथून बाहेर पडावे लागले. त्यामुळे आता या सर्व प्रकरणात प्रशासनाकडून कोणती कार्यवाही केली जाते हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

Share This Article