आजपासून नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात करतोय, भाजपमध्ये जातोय: अशोक चव्हाण

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 79 Views 2 Min Read
2 Min Read

आजपासून मी माझ्या राजकीय आयुष्याची पुनश्च: नव्याने सुरुवात करत आहे. आज मी रितसर भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, असे वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. ते  मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यापूर्वी घरातून निघताना अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत मी आज भाजपमध्ये प्रवेश करेन. भाजपच्या प्रदेश कार्यालयात अन्य काही  जिल्ह्यातील संभाव्य लोकांचे पक्षप्रवेश होतील. मात्र, मी आज काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराला माझ्यासोबत येण्यासाठी निमंत्रण दिलेले नाही, असे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी चव्हाण यांना आज तुम्ही सत्यसाईबाबांची पूजा करताना काय मागितले, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अशोक चव्हाणांनी सांगितले की, मी घरातून बाहेर पडताना नेहमीच पूजा करतो. ही माझी रोजची सवय आहे. चांगल्या कामासाठी बाहेर पडताना ईश्वराचा आशीर्वाद घ्यायचा ही माझी नेहमीची पद्धत आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

- Advertisement -

अशोक चव्हाणांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी?

अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. चव्हाणांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपकडून लगेचच राज्यसभा उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. अशोक चव्हाण यांच्यासोबत आज राजूरकर वगळता अन्य कोणताही विद्यमान आमदार भाजपमध्ये जाणार नाही. मात्र, राज्यसभा निवडणुकीत भाजपने चौथा उमेदवार उभा केल्यास अशोक चव्हाण गटातील काँग्रेस आमदारांकडून क्रॉस व्होटिंग होण्याची दाट शक्यता आहे. अनेक काँग्रेस आमदारांनी अशोक चव्हाण यांना फोन करुन आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगितले. परंतु, तुर्तास आम्हाला पक्षांतरबंदी कायद्यामुळे तुमच्यासोबत भाजपमध्ये येता येणार नाही. आम्ही योग्यवेळी तुमच्यासोबत येऊ, असे या काँग्रेस आमदारांनी अशोक चव्हाण यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

- Advertisement -

Share This Article