नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, अशोक चव्हाणांसोबत 6-7 आजी-माजी आमदार काँग्रेस सोडणार?

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 115 Views 3 Min Read
3 Min Read

मुंबई : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण  यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याची पत्र एबीपी माझाच्या हाती लागली आहे. अशोक चव्हाण हे काँग्रेस  सोडून भाजपमध्ये  प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. अशोक चव्हाण हे नांदेडचे  आमदार आहेत. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. मात्र ही भेट नार्वेकरांच्या वाढदिवसानिमित्त असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्यासोबत आणखी काही मोठे नेते आणि आजी- माजी आमदार राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. यामध्ये माजी मंत्री नसीम खान  आणि चंद्रकांत हंडोरे  यांच्या नावाची चर्चा आहे.

- Advertisement -

येत्या 14 तारखेला काँग्रेसच्या काही नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. यामध्ये नांदेड, धाराशिव आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय मराठवाड्यातील असे नेते जे राष्ट्रीय राजकारणात आहेत, ते सुद्धा काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

अशोक चव्हाणांसोबत कोण कोण काँग्रेस सोडणार? 

अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे आणखी बडे नेते राजीनामा देण्याची चर्चा आहे. यामध्ये माजी मंत्री नसीम खान आणि चंद्रकांत हंडोरे यांची नावं आहेत.

- Advertisement -

अशोक चव्हाण यांच्या जवळचे मानले जाणारे नागपूरचे दोन काँग्रेस आमदार आहेत. यामध्ये  राजू पारवे आणि विकास ठाकरे यांचा समावेश आहे. मात्र मला अशा घडामोडीची कुठलीही माहिती नाही मी मतदारसंघात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत दौरा करत आहे, अशी प्रतिक्रिया राजू पारवे यांनी दिली.

विकास ठाकरे म्हणाले,  अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्याची माहिती  मी पण टीव्हीवरूनच ऐकले आहे. राजीनामा दिल्याची माझ्याकडे कुठलीही माहिती नाही मी काँग्रेस पक्षामध्येच आहे, असं विकास ठाकरे म्हणाले.

अशोक चव्हाण यांचे समर्थक आमदार

  1. नसीम खान, माजी आमदार, चांदिवली
  2. चंद्रकांत हंडोरे, माजी आमदार, चेंबूर
  3. राजू पारवे, आमदार, उमरेड
  4. विकास ठाकरे, आमदार, पश्चिम नागपूर
  5. मोहन हंबर्डे,नांदेड दक्षिण
  6. जितेश अंतापूरकर, देगलूर (नांदेड)
  7. सुभाष धोटे, राजुरा, चंद्रपूर
  8. अमित झनक, रिसोड, वाशिम

अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवणार? 

अशोक चव्हाण यांना राज्यसभा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात मंत्रिपद देण्यासाठी भाजप नेत्यांकडून विरोध आहे. त्यामुळे त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

अशोक चव्हाण यांनी राहुल नार्वेकर यांची भेट 

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. या भेटीतच त्यांच्या भाजप प्रवेशाची आणि काँग्रेसच्या आमदारकीच्या राजीनाम्याची चर्चा झाल्याची माहिती आहे.

 प्रताप पाटील चिखलीकर काय म्हणाले? 

अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील अशी बातमी आहे. ते विधानभवनात राजीनामा देण्यासाठी गेल्याची माहिती आहे, पण अधिकृत माहिती नाही. ज्या पक्षाने त्यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत नेलं, तिथे अस्वस्थ राहण्याचं कारण नाही. ते भाजपमध्ये येत असतील तर त्यांचं मी स्वागत करतो, असं भाजपचे नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले. भाजपला कोणाचीही गरज नाही, पण ज्यांना गरज आहे, ते भाजपमध्ये येतात असंही चिखलीकरांनी सांगितलं.

Share This Article