स्कॉर्पिओ गाडी पुलावरून खाली कोसळली; एकाच कुटुंबियांतील पाच जणांचा मृत्यू

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 21 Views 2 Min Read
2 Min Read
Highlights
  • नांदेड येथील उमरी-भोकर मार्गावरील घटना

नांदेड : नातेवाईकाच्या मुलीचा वाढदिवस साजरा करुन कारने परत तेलगंणा राज्यातील नवीपेठ येथे जाणाऱ्या कुटुंबियांवर काळाने घाला घातला. स्कॉर्पिओ पुलावरून नाल्यात कोसळल्याने एकाच कुटुंबियातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे. उमरी – भोकर रोडवरील हाळदा मोघाळी येथे काल गुरुवारी रात्री ही घटना घडली. मयतामध्ये सहा आणि सात वर्षाच्या बालकांचा समावेश आहे. सविता शाम भालेराव (वय २५), रेखा परमेश्वर भालेराव (वय ३०), अंजना सुरेश भालेराव (वय ३०), प्रीती परमेश्वर भालेराव (वय ६), सुशील मारोती गायकवाड (वय ७ ) असं मयताची नावे आहेत.

- Advertisement -

भोकर तालुक्यातील रेणापूर येथील भालेराव कुटुंबीय हे तेलगंणा राज्यातील निझामाबाद जिल्ह्यातील वनेल, नवीपेठ येथे विटभट्टीच्या कामाला होते. सदरील कुटुंब भोकर शहरातील शेखफरीदनगर येथे संतोष भालेराव यांच्या मुलीच्या पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी गुरुवारी आले होते. वाढदिवस साजरा करुन रात्रीच्या वेळी स्कॉर्पिओने ११ जण परत चारचाकी वाहनाने वनेल येथे जात होते. दरम्यान, उमरी – भोकर रस्त्यावरील मोघाळी शिवारातील पुलावरुन जात असताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि स्कॉर्पिओ पुलावरून थेट नाल्यामध्ये कोसळली.

- Advertisement -

नाल्याला पाणी असल्याने दोघांचा गुदमरून जागीच मृत्यू झाला. तर इतर तीन जणांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. शिवाय दत्ता ज्ञानेश्वर भालेराव (वय ८), प्रितेश परमेश्वर भालेराव (वय ८), शोहम परमेश्वर भालेराव (वय ७), श्याम तुकाराम भालेराव (वय ३५), ज्ञानेश्वर तुकाराम भालेराव (वय २८), परमेश्वर तुकाराम भालेराव (वय २८), श्रीकांत अरगुलवार आदी ६ जण जखमी झाले आहेत. यातील गंभीर जखमी श्याम भालेराव यांना नांदेडला अधिक उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. डॉ. सागर रेड्डी, संगीता महादळे, पौर्णिमा दिपके, दिनेश लोटे हे उपचार करत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, अपघात घडल्यानंतर शेतकऱ्यांनी घटनास्थळी धावून येऊन मदत केली. मयतातील तीन महिला नात्याने सख्या जावा आहेत. घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड हे घटनास्थळी दाखल झाले होते.

Share This Article