लग्नासाठी नवरी मिळालीच पाहिजे; कोल्हापुरात क्रिएटिव्ह फलकांची रांग

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 41 Views 2 Min Read
2 Min Read

सध्या विवाहोच्छुक तरुणांना लग्नासाठी मुलगी मिळणं ही जणू एक जागतिक समस्याच झाली आहे. कमी होत असलेला मुलींचा जन्मदर, मुली आणि कुटुंबीयांच्या वाढत्या अपेक्षा, यासारख्या अनेक कारणांमुळे लग्नासाठी मुली मिळत नसल्याच्या तक्रारी अनेक उपवर मुलं करत असल्याचं पाहायला मिळतं. यामुळे कोल्हापुरात तरुणांपासून अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी ‘लग्नासाठी नवरी मिळालीच पाहिजे’ यासारखे विविध गमतीशीर फलक लावून सायकल फेरी काढली. खासबाग परिसर ते प्रयाग तीर्थक्षेत्र या मार्गावर काढलेल्या या अनोख्या सायकल फेरीची चर्चा सध्या शहरात रंगली आहे.

- Advertisement -

नेहमीच नागरी प्रश्नांचे विषय घेऊन ते गमतीदार पद्धतीने मांडून लोकप्रबोधन करणाऱ्या खासबाग येथील पावरफुल चिक्कू मंडळाच्या वतीने वेगवेगळे मजेशीर फलक सायकलला लावून ही सायकल फेरी काढण्यात आली. यातून सायकलचा वापर करा आणि प्रदूषण टाळा व आरोग्य चांगले राखा हा महत्त्वाचा संदेश देण्यात आला.

- Advertisement -

लग्नासाठी नवरी मिळालीच पाहिजे, कोल्हापुरात समुद्र झालाच पाहिजे, मटण स्वस्त झाले पाहिजे, पेट्रोल फुकट मिळालेच पाहीजे, बंबात लाकूड गुळगुळीत, एकच मासा गाडगभर रस्सा, हवेवर गाड्या चालल्याच पाहिजेत, आबा घुमिव, ह्योच नवरा पाहिजे, नवरीच्या पोशाखातील अभिनेत्री माधुरी दीक्षितचा फोटो असे गमतीदार लक्षवेधी फलक लावण्यात आले होते.

- Advertisement -

ही फेरी दुपारी बारा वाजताच्या सुमारास खासबाग येथून सुरु होऊन मिरजकर तिकटी, बिन खांबी गणेश मंदिर , महाद्वार रोड, पापाची तिकटी, कुंभार गल्ली, तोरस्कर चौक, शिवाजी पूल, आंबेवाडी चिखली या मार्गे या ठिकाणी पोहोचून परत त्याच मार्गाने खासबाग परिसरात गेली.

Share This Article