घरात गॅसचा स्फोट; माय-लेकराचे एकमेकांना कवटाळलेल्या अवस्थेत मृतदेह

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 12 Views 2 Min Read
2 Min Read

सोलापूर: शहराला चिटकून असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील तील्लेहाळ गावात रविवारी सकाळी घरगुती गॅसचा स्फोट झाला आहे. स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. शिलाबाई म्हाळप्पा धायगुडे (३५) आणि सात वर्षीय मुलगा माणिक धायगुडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. गॅसचा स्फोट इतका प्रचंड होता की काही कळायच्या आतच शीलाबाई धायगुडे आणि माणिक धायगुडे यांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

म्हाळप्पा धायगुडे यांनी पत्नी शिलाबाईला आणि मुलगा माणिक यांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला होता. परंतु भीषण आगीमुळे आत प्रवेश करता आला नाही. अखेर पत्नी आणि मुलगा डोळ्यादेखत जळून राख झाले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तील्लेहाळ गावात रविवारी सकाळी घरगुती गॅसचा स्फोट झाला. स्वयंपाक करताना ही दुर्दैवी घटना घडली. शिलाबाई म्हाळप्पा धायगुडे या रविवारी सकाळी नाश्ता करण्यासाठी स्वयंपाक करत होत्या. अचानकपणे गॅसने पेट घेतला. पती म्हाळप्पा हे बाहेर रिक्षा पुसत होते.

- Advertisement -

स्फोटाचा आवाज ऐकून घराकडे धावत गेले. तोपर्यंत घरगुती गॅस सिलेंडरमधून आगीचे लोण पसरले होते. स्वयंपाक घराला आगीने पूर्णपणे वेढा घातला होता. पत्नी आणि मुलगा हे जोरजोरात किंचाळत होते. आग इतकी भीषण होती, घरामध्ये प्रवेश करता आले नाही. स्फोटाच्या आवाजाने गावातील ग्रामस्थ देखील मदतीसाठी आले होते. पण त्यांना देखील काही करता आले नाही. तील्लेहाळ गावातील ग्रामस्थांनी ताबडतोब वळसंग पोलिसांना कळविले. फायर ब्रिगेडच्या वाहनाला पाचारण केले.

- Advertisement -

वळसंग पोलिसांनी आग आटोक्यात आणली. पंचनामा करण्यासाठी पोलिसांनी आत स्वयंपाक घरात प्रवेश करताच शीलाबाई धायगुडे आणि सात वर्षीय मुलगा माणिक धायगुडे हे दोघे एकमेकांना कवटाळलेल्या अवस्थेत होते. आई आणि मुलाचे संपूर्ण शरीर जळून गेले होते. दोन्ही मृतदेह पाहून पोलिसांचे डोळे देखील पाणावले होते. पंचनामा करून दोघांचे मृतदेह सोलापुरातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रविवारी दुपारी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने तील्लेहाळ गावात शोककळा पसरली आहे.

Share This Article